Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पतीचा अपघात, हातात रुतले काचेचे तुकडे; पडले 45 टाके
Ankita Lokhande and Vicky Jain: अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या पतीला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. विकी जैनवर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. त्याच्या अपघाताची माहिती निर्माता संदीप सिंहने दिली.

Ankita Lokhande and Vicky Jain: ‘बिग बॉस 17’चा स्पर्धक समर्थ जुरैलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आणि बिझनेसमन विकी जैनचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये विकी रुग्णालयात असून त्याला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विकीच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. विकीला नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न अनेकांनी विचारला. आता अंकिता आणि विकी यांचा जवळचा मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंहने एक पोस्ट लिहित सर्व माहिती दिली. त्याने सांगितलं की विकीचा अपघात झाला होता आणि त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. विकीच्या हातावर 45 टाके पडले. त्याच्यावर सर्जरी झाली असून आता त्याच्या प्रकृती ठीक असल्याचं संदीपने सांगितलं आहे.
एका भीषण अपघातातून विकी जैन वाचला असून गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकीच्या उजव्या हातात काचेचे अनेक तुकडे रुतल्याने, त्याला त्या हातावर 45 टाके पडले आहेत. संदीपने इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यामध्ये विकी हॉस्पिटलच्या बेडवर आराम करताना दिसत असून त्याच्यासोबत तिथे अंकिता असल्याचं पहायला मिळतंय.
View this post on Instagram
‘विकीच्या हातात काचेचे अनेक तुकडे रुतले गेले, त्यामुळे त्याच्या हातावर 45 टाके पडले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तो रुग्णालयातच आहे. या दु:खद अपघातानंतरही तो खूप स्ट्राँग आहे. अशा अवस्थेतही तो आम्हाला हसवतोय. जणू काही घडलंच नाही, असं त्याला पाहून वाटतंय. परंतु अंकिता लोखंडे.. तू एका सुपरवुमनपेक्षा कमी नाहीस. 72 तासांपासून त्याची काळजी घेतेय आणि दगडाप्रमाणे कणखरपणे त्याच्या बाजूने उभी आहेस. पतीवरील तुझं प्रेम हीच तुझी ढाल आहे. तुझं हेच धाडस त्याची ताकद आहे’, असं संदीपने लिहिलंय. परंतु विकीचा अपघात नेमका कुठे आणि कसा झाला, याविषयीची माहिती अद्याप समोर आली नाही.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताने 2019 मध्ये विकी जैनला डेट करण्यास सुरुवात केली. विकी हा मूळचा बिलासपूरचा असून तो मोठा व्यावसायिक आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2021 मध्ये या दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलं. अंकिता आणि विकीने ‘स्मार्ट जोडी’ आणि ‘बिग बॉस 17’ यांसारख्या शोजमध्ये भाग घेतला होता.
