अंकिता लोखंडेच्या मोलकरीणीची मुलगी बेपत्ता; 6 दिवसांनंतर अखेर काय घडलं ते आलं समोर
कांता या गेल्या अनेक वर्षांपासून अंकिता लोखंडेच्या घरी काम करत आहेत. त्यांची मुलगी आणि त्यांच्या मुलीची मैत्रीण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. अखेर त्या सापडल्याची माहिती अंकिताने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी काम करणाऱ्या महिलेची मुलगी आणि तिच्या मुलीची मैत्रीण दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. 2 ऑगस्ट रोजी अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे फोटो शेअर करत बेपत्ता होण्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता दोन्ही मुली सापडल्याचं तिने सांगितलं आहे. याबद्दल तिने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. अंकिताच्या घरी काम करणाऱ्या कांता यांची मुलगी सलोनी आणि त्यांच्या मुलीची मैत्रीण नेहा या दोघी 31 जुलैपासून बेपत्ता होत्या. त्यांना वाकोला परिसरात शेवटचं पाहिलं गेलं होतं. याविषयी अंकिताने पोलिसांकडे आणि चाहत्यांकडे मदत मागितली होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर दोघी जणी सापडल्या आहेत.
याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. ‘त्या दोघी फक्त आमच्या कुटुंबाचा एक भाग नाहीत तर ते कुटुंबीयच आहे. आम्हाला त्यांची खूप काळजी वाटतेय. त्यामुळे आम्ही मुंबई पोलिसांना आणि मुंबईकरांना विनंती करतोय की त्यांना शोधण्यात आमची मदत करा. जर कोणी त्यांना कुठे पाहिलं असेल किंवा त्यांच्याबद्दल काही ऐकलं असेल तर ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्या. तुमच्या पाठिंब्याची आणि प्रार्थनांची खूप गरज आहे’, अशी पोस्ट अंकिताने लिहिली होती. त्यासोबतच तिने सलोनी आणि नेहा या दोन्ही मुलींचा फोटो शेअर केला होता.
View this post on Instagram
आता दोघीजणी सुरक्षित सापडल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे दिली आहे. ‘मुली सुरक्षित सापडल्या आहेत. सलोनी आणि नेहा दोघी सुरक्षित आणि सुखरुप आहेत, हे कळवताना आम्हाला खूप आनंद होतोय. मी मुंबई पोलिसांचे खूप आभार मानते. त्याचप्रमाणे ज्या मुंबईकरांनी आमची मदत केली, त्यांचीही मी आभारी आहे’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
31 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सलोनी आणि नेहा बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्याविषयी कोणतीच माहिती कुटुंबीयांना मिळत नव्हती. बरेच प्रयत्न केल्यानंतर अखेर 2 ऑगस्ट रोजी अंकिताने सोशल मीडियाद्वारे मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे तिने मुंबई पोलिसांकडेही मदत मागितली. आता सहा दिवसांनंतर या दोघी सापडल्या आहेत.
