आई लवकरच भेटीन.., अर्जुन कपूरच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत; सुशांतच्या शेवटच्या पोस्टशी कनेक्शन

अर्जुन कपूरने आईच्या जन्मदिनी सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचून चाहते चिंतेत आहेत, कारण काहींनी त्याचं कनेक्शन सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या पोस्टशी लावलं आहे. नेमकी ही भानगड काय आहे, ते सविस्तर वाचा..

आई लवकरच भेटीन.., अर्जुन कपूरच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत; सुशांतच्या शेवटच्या पोस्टशी कनेक्शन
Arjun Kapoor and Sushant Singh Rajput
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 05, 2026 | 11:09 AM

अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या आईच्या किती जवळ होता, ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. विविध प्रसंगी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने आईबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला की आईविना त्याच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून निघू शकत नाही. आता आईच्या जन्मदिनी अर्जुन कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे. परंतु या पोस्टमधील मजकुरामुळे अर्जुनच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पोस्टमध्ये फक्त अर्जुनचं त्याच्या आईबद्दलच प्रेम आणि तळमळच दिसत नाही तर, त्याच्या जुन्या जखमाही यामुळे पुन्हा ताज्या झाल्याचं दिसून येतं. आयुष्यातील क्रूरतेबद्दलही त्याने यामध्ये लिहिलं आहे.

अर्जुन कपूरची पोस्ट-

‘जन्मदिनाच्या शुभेच्छा आई.. आज मला तुझी खूप आठवण येतेय. सध्या आयुष्य माझ्याशी फार क्रूरतेनं वागतेय. पण ठीक आहे. मी या आव्हानांना धैर्याने तोंड देतोय आणि पुन्हा उठून उभा राहतोय. कारण तू मला अडचणींना धैर्याने कसं तोंड द्यायचं हे शिकवलं आहेस. या संपूर्ण प्रवासात आपला आदर आणि प्रामाणिकपणा कसा टिकवून ठेवायचा, हेसुद्धा तू मला शिकवलंस. या प्रवासात आपण एकत्र असू.. तुला मी लवकरच भेटेन. एक दिवस आपण एकत्र मिळून तुझा जन्मदिन साजरा करू. तुझा प्रेमळ मुलगा’, अशा शब्दांत अर्जुनने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अर्जुन कपूरची ही पोस्ट वाचून चाहते विचारात पडले आहेत. ‘आपण लवकरच भेटू’ ही एक ओळ त्यांना सतावतेय. अर्जुन त्याच्या आयुष्यातील कुठल्या तरी गोष्टीमुळे प्रचंड निराश झाल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवरून वर्तवला आहे. काहींनी तर अर्जुनच्या या पोस्टचं कनेक्शन दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या इन्स्टा पोस्टशी जोडलं आहे. सुशांतने 3 जून 2020 रोजी शेवटची पोस्ट लिहिली होती. ही पोस्टसुद्धा त्याने त्याच्या आईसाठी लिहिली होती. अर्जुनप्रमाणेच सुशांतनेही त्याच्या आईसोबतचा स्वत:चा एक कोलाज फोटो शेअर केला होता.

‘धुंधला अतीत आंसू बनकर बह रहा है. अधुरे सपने मुस्कान की एक चाप तराशते हुए, एक अस्थायी जीवन, इन दोनों के बीच समझौता करा रहा है.. माँ’, अशी पोस्ट सुशांतने लिहिली होती. सुशांतची हीच पोस्ट शेवटची ठरली होती. त्यानंतर 14 जून 2020 रोजी तो मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सोशल मीडियावर युजर्स सुशांतच्या पोस्टचा उल्लेख करत अर्जुनबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

अर्जुन कपूर हा निर्माते बोनी कपूर आणि मोना शौरी कपूर यांचा मुलगा आहे. 2012 मध्ये मोना यांचं कॅन्सरने निधन झालं होतं. बोनी कपूर यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी दुसरं लग्न केलं. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे अर्जुन त्यांच्यावर खूप नाराज होता. स्टारकिड असूनही त्याचं आयुष्य काही सोपं राहिलं नाही. लहानपणी स्थूलतेची समस्या, आईवडिलांचे ताणलेले संबंध, त्यांचा घटस्फोट, वडिलांचं दुसरं लग्न या सर्व गोष्टींचा त्याच्या मनावर खूप परिणाम झाला. अर्जुनने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतरही त्याच्या वाट्याला हिटपेक्षा फ्लॉप चित्रपटच अधिक आले. सोशल मीडियावर त्याला अनेकदा ट्रोल करण्यात येतं. त्यातच वैयक्तिक आयुष्यात त्याचं अभिनेत्री मलायका अरोराशीही ब्रेकअप झालंय.