कोण आहे आशिष कपूर? बलात्कारप्रकरणी पुण्यातून अटक, महिलेकडून गंभीर आरोप
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आशिष कपूरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातून त्याला अटक झाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. संबंधित महिला आणि आशिषची ओळख इन्स्टाग्रामद्वारे झाली होती.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आशिष कपूरला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एका ‘हाऊस पार्टी’दरम्यान आशिषने बाथरुममध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. 11 ऑगस्ट रोजी याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आशिषचा शोध घेत होते. अनेक ठिकाणी आशिषच्या हालचालींचा मागोवा घेतल्यानंतर पोलिसांनी बुधवारी त्याला पुण्यातून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आशिषच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. आधी त्याचं लोकेशन गोव्याचं होतं आणि त्यानंतर तो पुण्यात असल्याचं आढळलं होतं. पोलिसांनी गोवा आणि पुणे या दोन्ही ठिकाणी त्यांच्या टीम्स पाठवल्या होत्या. अखेर पुण्यातून त्याला अटक करण्यात आली.
पीडित महिलेनं आधी आशिष कपूर, हाऊस पार्टीचं आयोजन करणारा त्याचा मित्र आणि इतर दोन अज्ञात व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर एका महिलेनं तिला मारहाण केल्याचंही तिने म्हटलं होतं. परंतु नंतर तिने तिचा जबाब बदलला. इतरांची नावं वगळून फक्त आशिषनेच बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. या घटनेचा व्हिडीओ काढल्याचाही आरोप संबंधित महिलेनं केला आहे. परंतु अद्याप कोणता व्हिडीओ हाती लागला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कपूर आणि त्या महिलेची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर त्याने तिला मित्राच्या घरी पार्टीसाठी बोलावलं होतं. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
घटनाक्रम काय आहे?
11 ऑगस्ट रोजी आशिष कपूर, त्याचा मित्र, त्याच्या मित्राची पत्नी आणि दोन अज्ञात पुरुषांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी महिलेनं आणखी एक जबाब दिला, ज्यामध्ये तिने आशिष कपूर आणि त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचा आणि एका महिलेनं तिला मारहाण केल्याचा आरोप केला. 21 ऑगस्ट रोजी आशिषच्या मित्राने आणि त्याच्या पत्नीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, जो मंजूर करण्यात आला. सुनावणीदरम्यान पीडित महिलासुद्धा कोर्टात उपस्थित होती.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानुसार, पीडित महिला आणि आशिष कपूर हे पार्टीदरम्यान वॉशरुममध्ये जाताना दिसले. बराच वेळ दोघं बाहेर न आल्याने त्याचा मित्र आणि इतर पाहुणे दरवाजा ठोठावू लागले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि तिथेच आशिषच्या मित्राच्या पत्नीने पीडितेला मारहाण केली.
कोण आहे आशिष कपूर?
आशिष कपूर हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा जन्म 17 ऑक्टोबर 1984 रोजी दिल्लीत झाला. त्याने ‘बंदिनी’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘वो अपना सा’, ‘लव्ह मॅरेज’, ‘प्रतिज्ञा 2’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
