कुणाची हिंमत आहे का..; अशोक मामांनी सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांचे टोचले कान

अभिनेता सचिन पिळगांवकर यांना त्यांच्या वक्तव्यांवरून अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगवर अभिनेते अशोक सराफ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांचे त्यांनी कान टोचले आहेत.

कुणाची हिंमत आहे का..; अशोक मामांनी सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांचे टोचले कान
Ashok Saraf and Sachin Pilgaonkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 16, 2026 | 3:45 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकर हे त्यांच्या काही वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होतात. या ट्रोलिंगवर आता ज्येष्ठ अभिनेते आणि सचिन पिळगांवकर यांचे जिवलग मित्र अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना पिळगांवकरांच्या ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते ट्रोलर्सवर चांगले संतापले. त्याचसोबत सचिनला ट्रोल होताना पाहून खूप वाईट वाटतं, असंही ते म्हणाले.

काय म्हणाले अशोक सराफ?

‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ पुढे म्हणाले, “सचिनने आज जे स्थान मिळवलं आहे, ते काही फुकट किंवा वारशाने मिळावलेलं नाही. त्यासाठी त्याने रक्ताचं पाणी केलं आहे. अगदी लहान वयापासून त्याने दिग्दर्शक, सहाय्यक म्हणून काम केलं आहे. संगीत आणि एडिटिंगचं तंत्रही त्याने आत्मसात केलं आहे. त्याला चित्रपटांशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास आहे. त्याच्या ज्ञानावर कुणी एक तरी बोट ठेवून दाखवेल का? कुणाची हिंमत आहे का? ट्रोल करणाऱ्यांना हे माहितच नसतं की समोरच्या माणसाने किती मेहनत घेतली आहे. आजकाल ट्रोलिंग हा लोकांच्या फावल्या वेळेचा छंदच झाला आहे.”

“काहीजण तर टपून बसलेले असतात. तो कुठे काय बोलतोय आणि त्यात कुठलं एखादं वाक्य सापडतंय. सापडलं की ट्रोल करण्यास मोकळे. पण ही लोकं एक गोष्ट विसरत आहेत की ज्या व्यक्तीला ते ट्रोल करत आहेत, त्याच्या पायाच्या नखाचीही सर त्यांना नाही”, अशा शब्दांत अशोक मामांनी टीकाकारांचे कान टोचले.

अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत, प्रतिभावान आणि दिग्गज कलाकार. कामाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दोन कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. अशोक सराफ यांचं सचिन यांच्या कुटुंबीयांशी जवळचं नातं निर्माण झालं होतं. हे नातं आधी सचिन यांचे वडील शरद पिळगांवकर यांच्यामुळे निर्माण झालं. पुढे शरद यांच्या निधनानंतर अशोक सराफच सचिन यांचा मोठा भाऊ आणि जवळचा मित्र बनले. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चोरावर मोर’ या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अशोक सराफ आणि शरद पिळगांवकर यांच्यात घट्ट मैत्री झाली होती.