
बॉलिवूडचे सुपर स्टार असणारे दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पण काही काळानंतर, त्याने तो व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम फीडवरून डिलीट केला आणि त्याचे इंस्टाग्राम अकाउंट देखील डिलीट केले. खरंतर, बाबिल या व्हिडीओमध्ये खूप रडताना दिसत आहे. त्याने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने चित्रपट जगतातील काही स्टार्सची नावे घेतली होती आणि बॉलिवूडला असभ्य, वाईट आणि फेक म्हटलं होतं. यासोबतच त्याने अनन्या पांडेचं नाव घेत तिच्यासोबत अनेक स्टार किड्सची नावे घेतली होती.
बाबिलच्या व्हिडीओवर राघव जुयालची प्रतिक्रिया समोर
बाबिलने त्याच्या व्हिडिओमध्ये शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल आणि आदर्श गौरव या स्टार्सची नावे घेतली आहेत. मात्र, आता या प्रकरणात अभिनेता राघव जुयालची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका मीडियाशी बोलताना राघवने सांगितले की, ते बाबिलच्या आईशी बोलला आहे. राघवलाही या बाबतीत खूप आश्चर्य वाटत आहे. बाबिलच्या या व्हिडीओ मागचं सत्य सांगत बाबिलला असलेल्या एका गंभीर आजाबद्दलही सांगितलं.
बाबिलच्या आईने राघवला काय सांगितले?
राघव म्हणाला की बाबिलने असे का केले हे त्याला अजिबात समजत नाही. तसेच, अभिनेत्याने सांगितले की त्याने नेहमीच बाबिलला पाठिंबा दिला आहे. तथापि, त्यांची मैत्री त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिसून येते. राघव म्हणाला की बाबिल सध्या खूप अस्वस्थ आहे. बाबिलच्या परिस्थितीबद्दल सांगताना राघवने म्हटलं की, “मी बाबिलची आई सुतापा मॅडमशी बोललो आणि त्यांनी सांगितले की त्याला चिंताग्रस्त झटके म्हणजे पॅनिक अटॅक किंवा एन्झायटी अटॅक येतात. तो हैदराबादमध्ये आहे, त्याला उद्यापासून शूटिंग सुरू करायचे आहे.”
विश्रांतीची गरज
राघवच्या म्हणण्यानुसार, बाबिलच्या आईने त्याला सांगितले की बाबिल घरी परत येत आहे. त्याला आराम करण्याची गरज आहे, त्याला हे समजून घेण्याची गरज आहे की आपण सर्व त्याच्यासोबत आहोत. पुढे राघवने सांगितले की, ‘प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो, मी एक कोरस डान्सर होतो. पण आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मला बरीच वर्षे लागली. बाबिलच्या तुलनेत, मी त्याच्यापेक्षा जास्त वयाचा नसलो तरी मला एक तेवढा अनुभव आहे. तसेच आम्ही सर्व त्याच्यासोबत आहोत.’ असंही त्याने म्हटलं.
बाबिलच्या या व्हिडीओवर त्याच्या कुटुंबाचं निवेदन
दरम्यान बाबिलच्या या व्हिडीओवर त्याच्या कुटुंबाने हे निवेदन जारी केले होते. त्यांनी म्हटलं ” गेल्या काही वर्षांत, बाबिल खानने केवळ त्याच्या कामासाठीच नव्हे तर त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलल्याबद्दल देखील खूप प्रेम आणि प्रशंसा मिळवली आहे. इतरांप्रमाणे, बाबिललाही कठीण दिवसांमधून जावे लागते आणि आजचा दिवस असाच एक होता. पण बाबिल आता पूर्णपणे ठीक आहे. पण त्याच्या एका व्हिडिओचा आणि त्याच्या शब्दांचा गैरसमज झाला. या क्लिपमध्ये, बाबिल त्याच्या काही सहकाऱ्यांचे प्रामाणिक कौतुक करताना दिसत आहे, ते भारतीय चित्रपटसृष्टीच्या महत्त्वपूर्ण योगदान कसे करतात हे त्याला सांगायचे आहे. अनन्या पांडे, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव, अर्जुन कपूर आणि अरिजित सिंग यांसारख्या अभिनेत्यांची नावे त्याने घेतली कारण कारण तो त्यांना मानतो. पण त्याच्या अर्धवट व्हिडीओमुळे हा गैरसमज झाला” असं त्याच्या घरच्यांनी म्हटलं आहे.