
एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या दोन्ही चित्रपटांनी जगभरात तगडी कमाई केली होती. आता निर्मात्यांनी या दोन्ही चित्रपटांना एकत्रितपणे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित केलं आहे. या नव्या व्हर्जनचं नाव आहे ‘बाहुबली: द एपिक’. बाहुबलीचे दोन्ही भाग एकत्र जोडून हा मोठा चित्रपट बनवण्यात आला आहे. यामध्ये प्रभास, राणा डग्गुबत्ती, तमन्ना भाटिया आणि अनुष्का शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नव्या व्हर्जनलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बाहुबली: द एपिक’ या चित्रपटाने शनिवारी 7 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांची कमाई 17.80 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या चित्रपटाने प्रीमिअरच्या दिवशी 1.15 कोटी रुपये कमावले होते. तर पहिल्या दिवशी 9.65 कोटींचं कलेक्शन जमलं होतं. यामध्ये तेलुगू भाषेतत 7.9 कोटी रुपये, हिंदीत 1.35 कोटी रुपये, कन्नडमध्ये 20 लाख रुपये, तमिळमध्ये 20 लाख रुपये आणि मल्याळम भाषेत 18 लाख रुपयांची कमाई झाली. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 20 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. कोणत्याही पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी कमाईची ही रक्कम खूप मोठी आहे.
The roar of Maahishmathi is echoing again!
🔥🔥🔥
Who’s watching #BaahubaliTheEpic this weekend?In Cinemas now! pic.twitter.com/HBMxyHah0M
— Baahubali (@BaahubaliMovie) November 1, 2025
केवळ देशभरातच नाही तर परदेशातही या चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. अमेरिकेत ‘बाहुबली : द एपिक’ने 6.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या चित्रपटाचं ग्लोबल कलेक्शनसुद्धा 18 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. री-रिलीज चित्रपटांच्या कलेक्शनला पाहिलं तर राजामौलींचा हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘गब्बर सिंह’लाही मागे टाकलं आहे. गब्बर सिंहने री-रिलीजच्या पहिल्याच दिवशी 5.75 कोटी रुपयांची कमाई केली होती.
2015 मध्ये ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि त्याच्या दोन वर्षांनंतर 2017 मध्ये ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता 31 ऑक्टोबर 2025 रोजी ‘बाहुबली : द एपिक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा केवळ एक चित्रपट नाही तर सिनेमॅटिक स्पेक्टॅकल आहे, ज्याला डॉल्बी अटमॉस साऊंड आणि हाय-एंड व्हिज्युअल इफेक्ट्ससह जगभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट सलग पाच तास थिएटरमध्ये दाखवले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक वेगळा आणि अनोखा अनुभव ठरतोय.