
अभिनेता भूषण प्रधानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे एकच चर्चा सुरू झाली. भूषणने अभिनेत्री केतकी नारायणसोबतचं खास फोटोशूट पोस्ट केलं होतं. केतकी गरोदर असल्याची गुड न्यूज देणारे हे फोटो होते. या दोघांचे फोटो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला होता. तुझं लग्न कधी झालं, असा प्रश्न नेटकऱ्यांनी भूषणला विचारला. या फोटोशूटमुळे प्रेक्षकांमध्ये कुतूहल आणि थोडा गोंधळ निर्माण झाला होता. अनेकांना ते दोघं खऱ्या आयुष्यात एकत्र असल्याचं वाटलं होतं. परंतु त्यामागचं सत्य आता समोर आलं आहे. आगामी ‘तू माझा किनारा’ या चित्रपटासाठी भूषण आणि केतकी एकत्र आले आहेत. त्यासाठीच केलेलं हे खास फोटोशूट होतं.
मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगळ्या कथा प्रेक्षकांसमोर आणणारे चित्रपट आले आहेत. त्या परंपरेत आता आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. ते म्हणजे ‘तू माझा किनारा’. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलेला अभिनेता भूषण प्रधान आणि तेलुगू, मल्याळम, हिंदी तसंच मराठी चित्रपटांमधून बहुआयामी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी केतकी नारायण आता प्रथमच एकत्र झळकणार आहेत. ‘तू माझा किनारा’च्या पोस्टर रिलीजमुळे दोघांच्या फोटोशूटमागच्या रहस्याचा उलगडा झाला आहे. तो फोटोशूट प्रत्यक्षात या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता, हे स्पष्ट झालंय.
‘घरत गणपती’, ‘ऊन सावली’, ‘लग्न कल्लोळ’, ‘जुनं फर्निचर’ यांसारख्या चित्रपटांतून भूषण प्रधानने आपली वेगळी छाप सोडलेली आहे. तर केतकीने ‘युथ’, ‘उदाहरनार्थ नेमाडे’ असे मराठी चित्रपट, ‘अंडरवर्ल्ड’ आणि ‘विचित्रम’ असे मल्याळम चित्रपट, ‘फादर’, चिट्टी’, ‘उमा कार्तिक’ तेलुगू चित्रपट आणि ’83’ सारखा हिंदी चित्रपट गाजवला आहे. तसंच तिने अनेक म्युझिक व्हिडिओ, शॉर्ट फिल्म्स आणि वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
या चित्रपटाचं कथानक नेमकं काय आहे, हे अजून गूढच ठेवण्यात आलं आहे. पण इतकं नक्की हा सिनेमा प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करणारा असून, साध्या वाटणाऱ्या आयुष्यातले असाधारण प्रश्न समोर आणणार आहे. ‘तू माझा किनारा’ फक्त पडद्यावर घडणारी कथा नाही, तर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात कुठेतरी उमटणारा आरसा आहे.
भूषण आणि केतकीची ही अनोखी जोडी नक्की कोणत्या रूपात दिसणार? त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये कोणते संघर्ष, कोणते शोध लपले आहेत? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ३१ ऑक्टोबर रोजी मिळणार आहेत.