
Saif Ali Khan: गुरुवारी मध्यरात्री अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला. सैफ-करिनाच्या घरात एक अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने घुसला. हल्लेखोराने अभिनेत्यावर चाकूने सहा वार केले. हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफ अली खानला पहाटे 3.30 वाजता मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता अभिनेत्याती प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. तर एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे.
सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्यांच्या शोधात मुंबई पोलीस आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. याता याप्रकरणी लेटेस्ट अपडेट समोर येत आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर संशयित आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या आसपास दिसला होता. मुंबई पोलिसांची पथके वसई, नालासोपारा आणि पालघर जिल्ह्यातील इतर भागात हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण 35 पथकं तयार केली आहेत. ज्यामध्ये मुंबई क्राईमने 15 टीम तयार केल्या असून मुंबई स्थानिक पोलिसांनी 20 पथकं तयार केल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातून एक जुनी वडिलोपार्जित तलवार जप्त केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही तलवार जुनी आणि वडिलोपार्जित असल्याचे दिसून येत आहे. तलवार सैफ अली खानच्या कुटुंबातील असू शकते. मात्र याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही.
हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या खबऱ्यांची मदत घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर लाकडी दांडा आणि लांब हेक्सा ब्लेड घेऊन पळताना दिसत आहे. यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. आरोपीने तपकिरी रंगाचा कॉलर टी-शर्ट आणि लाल टॉवेल घतल्याचं चित्र दिसून आलं. सैफच्या घरातून पळून जाण्यापूर्वी आरोपींनी कपडे बदलले होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.