
सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस 19’ हा लोकप्रिय शो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यंदाचा संपूर्ण सिझन भांडणांचाच होता. प्रत्येक ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाची शाळा घेतानाच दिसला. सध्या शोमध्ये ‘तिकिट टू फिनाले’चा टास्क सुरू आहे. हा टास्क गौरव खन्नाने जिंकला असून फिनालेमध्ये पोहोचणारा तो पहिला स्पर्धक ठरला आहे. आता या शोच्या ग्रँड फिनालेसंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स समोर आले आहेत. बिग बॉसचे काही सिझन्स ऐनवेळी लांबवले जातात. परंतु यंदाचा सिझन मात्र ठरलेल्या वेळेतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 19‘चा ग्रँड फिनाले हा 7 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यावेळी बिग बॉस ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पहायला मिळतोय. हा शो आधी जियो हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि त्यानंतर तो कलर्स टीव्हीवर टेलिकास्ट होतो. ग्रँड फिनालेच्या बाबतीतही असंच होणार आहे. परंतु विजेत्याचं नाव ओटीटी आणि टीव्हीवर एकत्र घोषित केलं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘तिकीट टू फिनाले’ या टास्कमध्ये चार स्पर्धक पुढे जाऊ शकले. यामध्ये गौरव खन्ना, अशनूर कौर, प्रणित मोरे आणि फरहाना भट्ट यांचा समावेश आहे. या चौघांपैकी गौरव खन्नाने इतर तिघांना हरवत फिनालेमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे आता ग्रँड फिनालेमध्ये गौरवसोबत इतक कोणते चार स्पर्धक असतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात गौरव खन्ना, अशनूर कौर, प्रणित मोरे, अमाल मलिक, मालती चहल, फरहाना भट, तान्या मित्तल आणि शहबाज हे स्पर्धक आहेत. या स्पर्धकांपैकी एक जण या आठवड्याच्या शेवटी बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे.
यंदाचा सिझन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू झाला होता. त्यामुळे जवळपास तीन महिन्यांनंतर हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोच्या सूत्रसंचालनासाठी सलमान खानने तगडी फी स्वीकारली आहे.