
Bigg Boss 19 News : बिग बॉस 19 चा सीझन सध्या चांगलाच गाजत आहे. मात्र या शोच्या लेटेस्ट भागात कॅप्टन्सी वरून जो गोंधळ झाला, त्यामुळे फक्त घरातले लोकंच नव्हे तर प्रेक्षकही अवाक् झाले. खरंतर कलर्सवर दिसणाऱ्या या रिॲलिटी शोमध्ये झालेल्या एका छोट्याशा वादाने सगळ गेम पलटला आणि बघता बघता तो एवढा वाढला की खुद्द ‘बिग बॉस’लाच मैदानात उतरावं लागलं. पण त्यामुळे झालं असं की अख्खाच्या अख्खा कॅप्टन्सी टास्कच रद्द झाला आणि त्यामुळे फरहाना भट्टचं नशीब पुन्हा एकदा चमकलं.
खरंतर या आठवड्यात, अशनूर कौरला कॅप्टनसी टास्कमध्ये “गेटकीपर” ची भूमिका सोपवण्यात आली. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, पण नंतर अमाल मलिकने अशनूरबद्दल केलेल्या एका जुन्या विधानामुळे वाद निर्माण झाला.
घरातल्या सदस्यांनी थांबवला टास्क
त्यानंतर अनेक स्पर्धकांनी अशी मागणी केली की, बिग बॉसने तात्काळ हस्तक्षेप करावा आणि अमाल मलिकच्या विधानामागील सत्य उघड करावं. नंतरच टास्क पुढे जाईल असं अनेकांचं म्हणणं होतं. पाहात पाहता ही मागणी इतकी तीव्र झाली की घरातील सदस्यांनी एकत्रितपणे टास्क थांबवला आणि पुढे जाण्यास नकार दिला.
‘बिग बॉस’चा कठोर निर्णय
बराच वेळ वाट पाहिल्यानंतर, जेव्हा घरातील सदस्यांनी स्वतःहून काम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा परिस्थिती शांत झाल्यासारखी वाटली. मात्र तेव्हाच बिग बॉसने एक मास्टरस्ट्रोक लगावला. “बिग बॉस” ने घरातील सदस्यांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की अशा प्रकारे कामात व्यत्यय आणणे हे स्वीकारार्ह नाही. परिणामी, त्यांनी संपूर्ण कॅप्टनसी टास्क तात्काळ रद्द करण्याची घोषणा केली. एवढंच नव्हे तर बिग बॉसने अशीही घोषणा केली की गेल्या आठवड्याची कॅप्टन फरहाना भट्ट हिचं कॅप्टनपद या आठवड्यातदेखील कायम राहील.
घरात भूकंप
मात्र बिग बॉसची घोषणा ऐकून सर्व स्पर्धक स्तब्ध झाले. फरहाना भट्टला कोणतेही प्रयत्न न करता दुसऱ्यांदा कर्णधारपद देण्यात आले, तर घरातील इतर सदस्यांनी एकमेकांवर दोषारोप करण्यास सुरुवात केली. फरहाना पुन्हा कर्णधार झाल्यानंतर घरात कसे वातावरण असेल हे पाहणं आता खूप मनोरंजक ठरेल.