
बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी उर्फ घन:श्याम दरोडे हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. छोटा पुढारी हा बिग बॉसच्या घरातील जवळचा मित्र सूरज चव्हाणच्या लग्नाला गैरहजर होता. त्यामुळे छोटा पुढारीला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये घन:श्यामची आई त्याला हळद लावताना दिसत होती. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु होती की छोटा पुढारीची होणारी नवरी कोण आहे? आता छोटा पुढारीने आणखी एक व्हिडीओ शेअर करत लग्नाबाबत माहिती दिली आहे.
काय होता व्हिडीओ?
घन:श्यामने काही दिवसांपूर्वी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये छोटा पुढारीची आई त्याच्या अंगाला हळद लावत असते. त्यानंतर छोटा पुढारी एका दुकानात जाऊन लग्नाचे कपडे खरेदी करताना दिसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की अनेकांनी त्याला “वहिनी कोण?”, “लग्नाची तारीख काय?” असे अनेक प्रश्न फोन करुन विचारले. आता छोटा पुढारीने आणखी व्हिडीओ शेअर करत लग्नाबाबत अपडेट दिली आहे.
काय म्हणाला छोटा पुढारी?
व्हिडीओमध्ये घन:श्याम हात जोडून बोलत आहे की, “दोन-तीन दिवसांपूर्वी जो हळदीचा व्हिडिओ मी टाकला, त्यावर अनेकांनी कमेंट करून आणि फोन करून विचारणा केली. यामुळे मी खूप हैराण झालो आहे. हा व्हिडिओ माझ्या लग्नाचा नाही, तो एका प्रमोशनचा भाग होता! मला अजून सेटल व्हायचं आहे. मी लग्नासाठी मुलगी बघतोय. पण मुलगी स्वभावाने चांगली असावी आणि कुटुंब सांभाळणारी असावी, अशी माझी अपेक्षा आहे. मला ती मुलगी अजून सापडलेली नाही.”
पुढे तो म्हणाला, “माझं अजून लग्न जमलेलं नाही, आई-वडिलांच्या मनावरती माझं लग्न आहे. पण काळजी करू नका, आपण तुमच्यासाठी लवकरच वहिनी आणू. माझी सर्वांना विनंती आहे की, मी टाकलेला व्हिडrओ प्रमोशनसाठी केलेला होता. माझं लगीन वगैरे जमलेलं नाही, पण लवकरच जमवूया! पण कृपया अफवा पसरवू नका की घनश्यामचं लग्न जमलं, घनश्याम बोहल्यावर चढला!”