T20 World Cup 2026: आयसीसीची IND vs PAK सामन्याबाबत मोठी घोषणा, दोघांवर मोठी जबाबदारी
India vs Pakistan Icc T20 World Cup 2026: आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं आयोजन हे 15 फेब्रुवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आयसीसीने या सामन्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी जवळपास सर्व तयारी झाली आहे. एकूण 20 पैकी बहुतांश संघ आपल्या शेवटच्या मालिकेतून वर्ल्ड कप स्पर्धेच्या सरावाला अंतिम रुप देत आहेत. भारत आणि श्रीलंका या 2 देशांकडे आयसीसीच्या या स्पर्धेचं यजमानपद असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तसेच चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. हा सामना 15 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. अशात या स्पर्धेला 8 दिवस असताना आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीसाठी पंच (Umpire) आणि सामनाधिकाऱ्यांची (Match Referee) नावं जाहीर केली आहेत. आयसीसीने साखळी फेरीसाठी एकूण 24 पंच आणि 6 सामनाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन प्रसिद्धीपत्रक जाहीर करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच बाद फेरीतील सामन्यांसाठी नंतर पंच आणि सामनाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली जातील, असंही आयसीसीने नमूद केलं आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यात पंच कोण?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 15 जानेवारीला होणार आहे. हा महामुकाबला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात श्रीलंका आणि इंग्लंडचे अंपायर असणार आहेत. कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) हे दोघे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात फिल्ड अंपायर म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. आयसीसीने या दोघांना फिल्ड अंपायर म्हणून अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी दिली आहे.
दोन्ही दिग्गज आणि अनुभवी पंच
कुमार धर्मसेना आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे दोघेही अनुभवी आणि दिग्गज पंच आहेत. दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचगिरीचा तगडा आणि दांडगा अनुभव आहे. धर्मसेना यांनी 2016 आणि 2022 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पंचगिरी केली आहे. तसेच धर्मसेना हे पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स या सामन्यातही पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. हा सामना 7 फेब्रुवारीला होणार आहे.
तसेच टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 7 फेब्रुवारीला यूएसए विरुद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात पॉल रायफल आणि रॉड टकर हे दोघे फिल्ड अंपायर असतील, अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे.
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी सामनाधिकारी : डीन कॉस्कर, डेव्हिड गिल्बर्ट, रंजन मदुगले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि जवागल श्रीनाथ.
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीसाठी फिल्ड अंपायर : रोलँड ब्लॅक, ख्रिस ब्राऊन, कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, वेन नाइट्स, जयरामन मदनगोपाल, नितीन मेनन, डोनोव्हान कोच, सॅम नोगाज्स्की, केएनए पद्मनाभन, अल्लाउद्दीन पालेकर, अहसान रझा, लेस्ली रेफर, पॉल रीफेल, लँगटन रुसेरे, शरफुद्दौला इब्ने शाहिद, गाझी सोहेल, रॉड टकर, ॲलेक्स व्हार्फ, रवींद्र विमलासिरी आणि आसिफ याकूब.
