T20 World Cup 2026 Schedule: भारत आणि पाकिस्तान एकाच गटात, या दिवशी या ठिकाणी सामना
ICC Men's T20I WC 2026 Schedule: भारत आणि पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींना हायव्होल्टेज सामना पाहण्याची अनुभूती मिळणार आहे. हा सामना कधी होईल आणि कोणत्या ठिकाणी ते जाणून घ्या.

T20 World Cup 2026 Schedule, Match Timings: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. ही स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात असेल याबाबत कळलं होतं. पण कधी आणि केव्हापासून हे मात्र गुलदस्त्यात होतं. अखेर यावरून पडदा दूर झाला असून स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान सामना होईल की नाही याबाबत शंका होती. पण क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरूद्धचा सामना पाहता येणार आहे. कारण हे दोन्ही संघ एकाच गटात आहे. एकूण चार गट असून 20 संघाची पाच प्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. भारताच्या गटात अमेरिका, पाकिस्तान, नेदरलँड आणि नामिबिया हे संघ आहे. तसं पाहिलं तर भारतासाठी हा सोप गट आहे आणि सुपर 8 फेरीत आरामात जागा मिळवेल असं दिसत आहे.
गतविजेत्या भारतीय संघाचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. हा सामना 7 फेब्रुवारीला मुंबईत होईल. त्यानंत भारत आणि नामिबियाची लढत होईल. हा सामना 12 फेब्रुवारीला होईल. त्यानंतर तिसरा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ कोलंबोला रवाना होणार आहे. भारत पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला सामना होईल. कारण पाकिस्तानने भारताप्रमाणे निर्णय घेतला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात आणि पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका खेळत नाही. तर पाकिस्तानने तसंच सूत्र अवलंबलं आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्याती सामना तटस्थ ठिकाणी म्हणजे श्रीलंकेतील कोलंबोत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फक्त मल्टीनेशन स्पर्धेतच आमनासामना होतो. त्यानंतर भारताचा सामना नेदरलँडशी होईल. हा सामना अहमदाबादमध्ये 18 फेब्रुवारीला होईल.
भारताचे सामने कधी ते जाणून घ्या
- भारत विरुद्ध अमेरिका, 7 फेब्रुवारी, मुंबई
- भारत विरुद्ध नामिबिया, 12 फेब्रुवारी, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 फेब्रुवारी, कोलंबो
- भारत विरुद्ध नेदरलँड्स, 18 फेब्रुवारी, अहमदाबाद
प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर 8 फेरीत जागा मिळवतील. तसं पाहिलं तर भारत आणि पाकिस्तानसाठी सोपा गट आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सुपर 8 फेरी गाठण्याची संधी आहे. चार पैकी 3 सामने जिंकणारा संघ सुपर 8 फेरीत आरामात जागा मिळवेल. पण काही उलटफेर झाला तर मात्र जर तरचं गणित लागू पडेल. भारत पाकिस्तान सामन्यात नो हँडशेक पॉलिसी कायम राहणार असंच दिसत आहे. वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतही तसंच झालं होतं.
