
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळतोय. बुधवारी मुंबईहून बारामतीला जाताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित दादांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आज (गुरुवारी, 29 जानेवारी) बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. या गर्दीतला एक चेहरा हा ‘बिग बॉस मराठी’चा विजेता आणि कंटेंट क्रिएटर सूरज चव्हाणचा होता. अनेकांसाठी अजित पवार हे दादा होते, परंतु सूरजसाठी ते त्याच्या आई-अप्पांसारखेच होते. आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं, असं म्हणत त्याने सोशल मीडियावर अत्यंत भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जाऊन सूरजने अजित दादांचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी त्याने त्यांच्या चितेसमोर डोकं टेकवून नमस्कार केला. आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती गमावल्याची भावना यावेळी सूरजच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ‘आई वडिलांनंतर मी तुमच्या माझ्या आई-आप्पांना पाहत होतो आणि तुम्ही पण मला सोडून गेलात. आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं, मिस यू दादा’, असं कॅप्शन देत सूरजने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यासोबतच सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजितदादांसोबतचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो एका कार्यक्रमात मंचावर अजित दादांची भेट घेतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर अजित पवारसुद्धा त्याच्याशी अत्यंत आपुलकीने चर्चा करतात.
अजित पवारांच्या निधनानंतरही सूरजने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली होती. ‘मित्रांनो माझा देव चोरला आज. मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं. माझी काळजी घेतली. मला नवीन आयुष्य मिळवून दिलं. अजित दादांसारखा देवमाणूस या जगात नाही, याचं मला लय वाईट वाटतंय, लय दुःख होतंय. माझ्या आई आबानंतर अजितदादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवीन,’ अशा शब्दांत तो व्यक्त झाला होता. सूरज चव्हाणला स्वत:चं घर बांधून देण्याचा शब्द अजित पवारांनी दिला होता. आपल्या शब्दाचे पक्के असणाऱ्या अजितदादांनी सूरजला सुंदर घर बांधून दिलं होतं.