
‘बिग बॉस मराठी’चा विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या गोरेगाव येथील घरात एक दुर्घटना घडली. त्याच्या घरात भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून राख झाले आहे. शिव ठाकरे आणि त्याचे कुटुंबीय सुखरुप आहेत. या दुर्घटनेनंतर शिवच्या टीमकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे की अभिनेता सुखरूप आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. आग ही कोल्टे पाटील व्हर्व्ह बिल्डिंगमधील घरात लागली होती.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शिव ठाकरेच्या घराच्या आतल्या भागाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये भीषण आगीनंतर घराची झालेली अवस्था दाखवण्यात आली आहे. घरातील भींती आगीमुळे काळ्या झाल्या आहेत तसेच फर्निचर जळून राख झाले आहे. शिवच्या मालमत्ता आणि सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. व्हिडीओत अग्निशमन दलाची टीम घरात आग लागण्याच्या कारणांचा तपास करताना आणि आवश्यक ते उपाय योजताना दिसत आहे.
शिव ठाकरेच्या घरात लागली आग
शिव ठाकरेच्या टीमनेही या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. अधिकृत नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘@shivthakare9ला आज सकाळी एका अपघाताचा सामना करावा लागला. कारण कोल्टे पाटील व्हर्व्ह बिल्डिंगमधील त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी आग लागली. अभिनेत्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, पण घराला मात्र याची झळ बसली आहे!’ घटनेच्या वेळी शिव ठाकरे मुंबईत नव्हते आणि कालच ते शहरात परतले आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर विमानतळावरून एक फोटो शेअर करत लिहिले, ‘मुंबई वापस’ असे म्हटले होते,
शिव ठाकरेच्या कामाविषयी
शिव ठाकरे हा बिग बॉस मराठीचा विजेता ठरला होता. त्यानंतर तो हिंदी ‘बिग बॉस’मध्ये दिसला. याशोने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. महाराष्ट्रातील एका साधारण गावातून आलेल्या शिवने एकेक रिअॅलिटी शोच्या माध्यमातून भारतीय मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘रोडीज’पासून ते ‘बिग बॉस’च्या मराठी आणि नंतर हिंदी आवृत्तीपर्यंत, त्यांनी स्वबळावर नाव कमावले. शिवला ‘खतरों के खिलाड़ी’ आणि ‘झलक दिखला जा’साठीही ओळखले जाते.