Mehmood Junior passes away: अखेर कॅन्सरने ज्युनिअर मेहमूदला हरवले, 67 व्या वर्षी निधन
Actor Junior Mehmood Death: बॉलीवूड कलाकार ज्युनिअर मेहमूद हे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांची अखेरची इच्छा बोलून दाखवली होती. ही इच्छा अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांनी पूर्ण केली होती.
मुंबई | 8 डिसेंबर 2023 : बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार ज्युनिअर मेहमूद यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचे जवळचे मित्र सलीम काझी यांनी दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस ते जिवंत राहणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. त्यांना कॅन्सर झाला होता. त्यांचे नाव नईम सय्यद होते. कॉमेडियन मेहमूद यांनी त्यांना हे नाव दिले होते. जॉनी लीवर यांनी त्यांना मदत केली होती. यापूर्वी जॉनी लिव्हर यांनी ज्युनिअर मेहमूदसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत ज्युनिअर मेहमूद यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची माहिती देत त्यांच्यासाठी दुवा मागण्याचे आवाहन केले होते.
जितेंद्रने घेतली भेट
जुनिअर मेहमूद यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 67 वर्षी कर्करोगाशी युद्ध ते जिंकू शकले नाही. त्यांचा कर्करोग (कॅन्सर) चौथ्या टप्प्यापर्यंत पोहचला होता. मेहमूद यांना नोव्हेंबरमध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचे जुने मित्र जितेंद्र, सचिव पिळगावकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली होती. यावेळी जितेंद्र चांगलेच भावूक झाले होते. काही दिवसांपूर्वीच ज्युनिअर मेहमूद यांनी जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही कलाकारांना त्यांच्या या इच्छेबद्दल कळताच त्यांनी मेहमूद यांची भेट घेतली होती.
सचिनसोबत जमली होती जोडी
बालकलाकार म्हणून ज्युनिअर मेहमूद यांनी अनेक चित्रपटांत काम केले. यावेळी सचिन पिळगावकर यांची आणि त्यांची जोडी फार लोकप्रिय झाली होती. त्यांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
राजेश खन्ना सोबत जमली होती जोडी
ज्युनिअर मेहमुद यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. 1967 मध्ये संजीव कुमार यांचा नौनिहाल या चित्रपटातून त्यांनी करियरला सुरुवात केली. त्यावेळी ते फक्त 11 वर्षांचे होते. संघर्ष, ब्रह्मचारी, दो रास्ते, कटी पतंग, हाथी मेरे साथी, हंगामा, छोटी बहू, दादागिरीसह अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांनी बलराज साहिनीपासून सलमान खानपर्यंत अनेक स्टारसोबत काम केले. सर्वाधिक चित्रपट त्यांनी राजेश खन्ना सोबत केले. राजेश खन्नासोबत हाथी मेरे साथी या चित्रपटात त्यांची विशेष भूमिका राहिली.