प्रिती झिंटाला कोर्टाकडून दिलासा, आता मोठ्या कंपन्यांचे धाबे दणाणतील, काय आहे प्रकरण?
अभिनेत्री प्रिती झिंटा हिला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. पण काही कंपन्यांवर मोठं संकट येण्याची शक्यता नकारता येत नाही. कारण कोर्टाने अभिनेत्रीला याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे... तर जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण...

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून गुगल एलसीसी, मेटा आणि अन्य कंपन्यांविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी मिळाळी आहे. कारण तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर करत एआय-जनरेटेड (AI-generated) ‘डीपफेक, फेरफार केलेल्या प्रतिमा, चॅटबॉक्स आणि अन्य डिजिटल सामग्रीचा वापर करून चुकीच्या मर्गाचा त्यांचा उपयोग केला जात होता. रिपोर्टनुसार, न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी मंगळवारी झिंटा हिला मुंबई उच्च न्यायालयात प्रस्तावित खटला दाखल करण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर याचिका निकाली काढली.
खटल्यात व्यक्तिमत्त्वविषयक आणि कॉपीराइट अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा आरोप
प्रिती झिंटा हिच्या वतीने बाजू मांडताना वकील रोहन कदम यांनी सांगितलं, प्रस्तावित दाव्याद्वारे प्रतिवादींविरुद्ध मनाईहुकूम मागण्यात आला आहे; हा दावा अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वविषयक हक्क, कॉपीराइट, प्रतिष्ठेचे मूल्य, आणि लौकिक यांच्या कथित उल्लंघनाबाबत आहे. न्यायालयात मांडण्यात आलेल्या युक्तिवादानुसार, प्रतिवादींनी कथितरीत्या एआय (AI) द्वारे तयार केलेले डीपफेक व्हिडिओ, मीम्स, फेरफार केलेल्या प्रतिमा, व्यक्तिमत्त्वे आणि इतर प्रकारची डिजिटल सामग्री “तयार केली, अपलोड केली, प्रसारित केली आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली,” आणि त्याद्वारे झिंटा हिच्या अधिकारांचं उल्लंघन केलं.
कदम यांनी न्यायालयाला सांगितलं की, प्रिती झिंटा एक भारतीय नागरिक आहे आणि ती मुंबईत राहते. वकिलांनी असा युक्तिवाद केला की, अभिनेत्रीची विश्वासार्हता, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्व हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतात. न्यायालयाने हे देखील नमूद केलं की, कथितरीत्या उल्लंघन करणारी सामग्री केवळ मुंबईतच प्रसारित केली जात नव्हती, तर ती ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सद्वारे जागतिक स्तरावरही उपलब्ध होती.
एआय द्वारे निर्मित केलेल्या सामग्रीमुळे वाढली चिंता
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवाप वाढला आहे. आयच्या मदतीने प्रसिद्धी झोतात असलेल्या लोकांची संमती नसताना त्यांची हुबेहूब नक्कल करणारे ‘डीपफेक’ व्हिडिओ, डिजिटल पद्धतीने फेरफार केलेल्या प्रतिमा आणि AI-निर्मित व्यक्तिमत्त्वे तयार केली जातात. याबाबत जगभरात चिंता वाढत असतानाच ही बातमी समोर आली आहे. ‘जनरेटिव्ह एआय’च्या (Generative AI) युगात आपल्या वैयक्तिक हक्कांचे आणि डिजिटल ओळखीचे संरक्षण करू पाहणाऱ्या सेलिब्रिटींच्या कायदेशीर खटल्यांच्या वाढत्या यादीत झिंटा हिने दाखल केलेल्या खटल्याची भर पडली आहे. याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी यावर आक्षेप घेतला आहे.