Anupam Kher: “साऊथ फिल्म्स हॉलिवूडची कॉपी करत नाहीत, म्हणूनच..”; अनुपम खेर यांचा आमिरला टोमणा

| Updated on: Aug 26, 2022 | 11:38 AM

बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांच्या वादावर आजवर अनेक कलाकारांनी आपली मतं मांडली आहेत. आता या वादावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Anupam Kher: साऊथ फिल्म्स हॉलिवूडची कॉपी करत नाहीत, म्हणूनच..;  अनुपम खेर यांचा आमिरला टोमणा
अनुपम खेर यांचा आमिरला टोमणा
Image Credit source: Twitter
Follow us on

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड (Bollywood) विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट (South Films) असा मोठा वाद सुरू आहे. एकीकडे दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी व्हर्जन बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असताना दुसरीकडे बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट फ्लॉप ठरत आहेत. बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांच्या वादावर आजवर अनेक कलाकारांनी आपली मतं मांडली आहेत. आता या वादावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कथेवर लक्ष केंद्रीत केलं जातं, तर बॉलिवूड हे स्टार्सवर लक्ष केंद्रीत करतात, असं ते म्हणतात. नुकताच प्रदर्शित झालेला ‘कार्तिकेय 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. तर लाल सिंग चड्ढा आणि दोबारा यांसारखे बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांवर आपला प्रभाव पाडू शकत नाहीयेत. ‘कार्तिकेय 2’मध्ये अनुपम खेर यांनीसुद्धा भूमिका साकारली आहे.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “तुम्ही ग्राहकांसाठी एखादी गोष्ट बनवता. ज्यादिवशी तुम्ही तुमच्या ग्राहकांकडे दुर्लक्ष करता, तेव्हापासून खऱ्या समस्येला सुरुवात होते. आम्ही मोठे चित्रपट करून तुमच्यावर उपकार करतोय, असा विचार करू नये. सामूहिक प्रयत्नांमुळे यश मिळवता येतं आणि हे मी तेलुगू चित्रपटांत काम करून शिकलोय. मी आणखी तेलुगू चित्रपटात काम करणार आहे. याआधी मी तमिळ भाषेतही काम केलंय. मी दोघांमध्ये तुलना करत नाहीये, पण मला असं वाटतं की ते हॉलिवूडची कॉपी करत नाहीत म्हणून त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटतात. ते फक्त कथा सांगतात आणि इथे आपण स्टार्सना अक्षरश: विकतोय.”

हे सुद्धा वाचा

‘कार्तिकेय 2’ हा 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कार्तिकेय’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. चंदू मोंडेटी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये अनुपम खेर यांनी सहाय्यक भूमिका साकारली आहे. ‘मेरी तो निकल पडी दोस्तो.. द काश्मीर फाईल्सनंतर माझा कार्तिकेय 2 हा चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला आहे’, अशी पोस्ट अनुपम यांनी इन्स्टाग्रामवर लिहिली होती. लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन या चित्रपटांपेक्षा कार्तिकेय 2 च्या हिंदी व्हर्जनने चांगली कमाई केली आहे. निखिलची मुख्य भूमिका असलेल्या कार्तिकेय 2 या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जगभरात 48 कोटींचा गल्ला जमवला.