Katrina Kaif: एकतर्फी प्रेमातून सोशल मीडियावर दिला त्रास; कतरिनाशी करायचं होतं लग्न, पोलिसांनी केली अटक

मुंबई पोलिसांनी मनविंदर सिंह नावाच्या एका व्यक्तीला अटक केली असून तो स्ट्रगलिंग अभिनेता आणि कतरिनाचा मोठा चाहता आहे. त्याला कतरिनासोबत लग्न करायचं होतं आणि त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून तो तिला सोशल मीडियावर सतत त्रास देत होता.

Katrina Kaif: एकतर्फी प्रेमातून सोशल मीडियावर दिला त्रास; कतरिनाशी करायचं होतं लग्न, पोलिसांनी केली अटक
कतरिना-विकीला धमकी देणाऱ्याला अटक
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 3:01 PM

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मनविंदर सिंह (Manvinder Singh) असं या आरोपीचं नाव आहे. मनविंदर सिंह हा स्ट्रगलिंग अभिनेता असल्याचं कळतंय. कतरिनाशी लग्न करण्याची मनविंदरची इच्छा होती. एकतर्फी प्रेमातून त्याने तिला स्टॉक केलं, अशी माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर धमकी मिळताच विकीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मनविंदर गेल्या काही दिवसांपासून सतत कतरिनाला स्टॉक करत होता. मुंबई पोलिसांनी मनविंदर सिंह नावाच्या एका व्यक्तीला अटक केली असून तो स्ट्रगलिंग अभिनेता आणि कतरिनाचा मोठा चाहता आहे. त्याला कतरिनासोबत लग्न करायचं होतं आणि त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून तो तिला सोशल मीडियावर सतत त्रास देत होता.

अभिनेता विकी कौशलच्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. क्रमांक 911/2022 अन्वये 506(2), 354(डी) आयपीसी कलम 67 आयटी कायदाअंतर्गत इंस्टाग्रामवर एक व्यक्ती धमकावत आहे आणि धमकीचे संदेश पोस्ट करत असल्याची तक्रार करण्यासाठी तो सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गेला होता. आरोपी कतरिनाचा पाठलाग करत होता आणि तिला धमकावत होता, अशी तक्रार विकीने केली.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही पत्राच्या स्वरूपात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाप्रमाणेच तुमचीही हत्या करू, असं त्यात लिहिलं होतं. या घटनेनंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला बॉलिवूडमधील व्यक्तींकडून पैसे उकळायचे होते, हे तपासादरम्यान स्पष्ट झालं. सलमानने शुक्रवारी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्याने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.