Nana Patekar : सीनसाठी नाही रे, वडापावसाठी…नाना पाटेकरांचं अभिनयावर एवढं प्रेम की…तो किस्सा वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!
निलेश साबळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. सोबतच त्यांनी वडापावचा किस्सा सांगितला आहे. सोबतच त्यांनी नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली आहे.

Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या जाण्याने सिनेजगतात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जातेय. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच सिनेजगतातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे बॉलिवूडमध्ये एक वेगळे वजन होते. मराठी सिनेसृष्टीतही त्यांना वेगळी प्रतिष्ठा होती. त्यांनी छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावलेली होती. दरम्यान त्यांच्या निधनानंतर याच कार्यक्रमातील अभिनेते निलेश साबळे यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करत एक खास किस्सा सांगितला आहे. या पोस्टमुळे नाना पाटेकर यांचे आपल्या कामावर किती प्रेम होते, हे अधोरेखीत होते.
निलेश साबळे यांच्या पोस्टमध्ये नेमके काय आहे?
निलेश साबळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. सोबतच त्यांनी वडापावचाही किस्सा सांगितलाय. ‘रिहर्सलच्या वेळची ही आठवण…नानांनी चला हवा येऊ द्या च्या मंचावर भाऊबरोबर हे स्किट सादर केलं होतं… यामधे ते वडापाव खातात असा प्रसंग होता.., ठरल्या प्रमाणे तीन वडापाव नानांसमोर ठेवण्यात आले.., आम्ही त्यांना सांगितल अभिनयापूरता थोडासाच वडापाव खाल्ला तरी चालेल, त्यावर ते हसून म्हणाले, मग कसला अभिनय.. मी हे तीनही वडे खाणार…’ अशी आठवण साबळे यांनी सांगितली.
View this post on Instagram
सर फार चांगला झाला आहे सीन
तसेच, पुढे काय घडलं हे सांगताना ‘सीन संपला… सगळ्यांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले.. त्यावर नाना म्हणाले, “कसं झालं?” मी म्हणालो… “उत्तम “ त्यावर ते म्हणाले .., “अजून एकदा हा संपूर्ण सीन करूयात” मी म्हणालो, “ सर फार चांगला झाला आहे सीन” त्यावर ते हसून म्हणाले, “सीन साठी नाही रे , ‘वडापाव’ साठी करूयात, फार चांगला होता रे वडापाव..!” आणि तो सीन खरोखरच परत चित्रित झाला…पण नंतर आम्हाला कळलं… नानांनी तो वडापावसाठी रिशूट केला नव्हता, तर स्वतः मधल्या आणखी उत्तम अभिनेत्याला शोधण्यासाठी केला होता…’ अशी खास आठवण साबळे यांनी सांगितली. सोबतच आमचं भाग्य की, आपल्या सारख्या थोर अभिनेता आणि माणसाबरोबर आम्हाला काम करायला मिळालं, अशी भावना व्यक्त करत साबळे यांनी नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली.
