
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटामुळे 2025 वर्षाची सुरुवात बॉलिवूडसाठी सकारात्मक ठरली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदार आणि अक्षय खन्ना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला थिएटरमध्ये 25 दिवस पूर्ण झाले असून अजूनही कमाई सुरूच आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अजूनही थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. आता ‘छावा’ लवकरच गेल्या वर्षातील सर्वांत हिट ‘स्त्री 2’ या चित्रपटालाही मागे टाकणार असल्याचं दिसतंय. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री 2’ने गेल्या वर्षी सर्वाधिक कमाई केली होती.
प्रदर्शनाच्या 25 व्या दिवशी ‘छावा’ने भारतात 6.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे देशात या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 526.05 वर पोहोचला आहे. पंचविसाव्या दिवशी हिंदी आणि तेलुगू भाषेत ‘छावा’ची कमाई चांगली झाली. यासोबतच या चित्रपटाने जगभरातील कमाईचा 700 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे विकी कौशलचा ‘छावा’ हा सर्वाधिक कमाई करणारा नववा हिंदी चित्रपट ठरला आहे.
प्रदर्शनाच्या चौथ्या सोमवारी ‘छावा’च्या कमाईत थोटी घट झाली असली तरी जवळपास महिनाभर थिएटरमध्ये टिकून राहण्याचं आव्हान या चित्रपटाने चांगलंच पेललं आहे. 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 705.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘छावा’ने प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात ‘स्त्री 2’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकलं आहे. त्यामुळे एकूण कमाईच्या बाबतीतही विकी कौशलचा ‘छावा’ हा राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ला मागे टाकू शकेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. ‘स्त्री 2’ने भारतात 597.99 कोटी रुपयांचा तर जगभरात 857.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ‘छावा’ने आणखी जोर लावल्यास हा आकडा तो सहज पार करू शकेल.
शनिवार- 8.5 कोटी रुपये
रविवार- 11 कोटी रुपये
सोमवार- 3.25 कोटी रुपये
शनिवार- 16.75 कोटी रुपये
रविवार- 10.75 कोटी रुपये
सोमवार- 6.25 कोटी रुपये
दिनेश विजनच्या ‘मॅडॉक फिल्म्स’ बॅनरअंतर्गत निर्मित झालेल्या ‘छावा’ या चित्रपटाची कथा शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित आहे. विशेष म्हणजे ‘स्त्री 2’ या चित्रपटाचीही निर्मिती ‘मॅडॉक फिल्म्स’ बॅनरअंतर्गतच झाली होती.