
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने आतापर्यंत जवळपास ३०० कोटी रूपयांपेक्षा जास्त कमी केली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असे दाखवण्यात आले आहे. आता यावरुन गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक शिर्के यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट दिग्दर्शकाला आवाहन केले आहे.
‘छावा’ सिनेमातील त्या सीनवरून शिर्के कुटुंबीयांनी दिग्दर्शकाच्या विरोधात न्यायालयात जाऊन लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात शिर्के कुटुंबीय एकत्र जमले होते. त्यांनी गावकऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच देवीची पूजा करत न्यायालयीन लढाईला सुरुवात करत असल्याचा निर्णय घेतला.
‘महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लढा उभा राहत आहे. शिर्के घराणं एकत्र येत आहे. त्यामुळे वातावरण तापण्याआधीच उतेकर यांनी चित्रपटातील वादग्रस्त भाग तात्काळ वगळावा’ अशी मागणी शिर्के कुटुंबीयांनी केली आहे. ‘विशिष्ठ वर्गाला वाचवून दुसऱ्याला बदनाम करू नये, ही बदनामी आमच्यासाठी नुकसानदायी आहे. त्याचबरोबर पैसे कमावण्यासाठी चित्रपट काढला नसल्याचे ते (दिग्दर्शक) म्हणत असतील तर यातून कमावलेला पैसा त्यांनी सामाजिक कार्यासाठी वाहून देत आहे, असं जाहीर करावे’ अशी भूमिका शिर्के कुटुंबीयांनी मांडली आहे.
गनिमीकाव्याने लढा लढणार
शिर्के कुटुंबीयांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना, ‘आम्ही छत्रपती यांचे मावळे आहोत. गनिमीकाव्याने लढा लढणार. लढा कसा असणार हे आत्ता सांगणार नाही. त्यांना वेळोवेळी तो कळेल आणि त्यांना तो सहन होणार नाही’ असा इशारा दिला आहे.
काय आहे वाद?
‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या लढाई आणि औरंगजेबाने त्यांचे केलेले हाल याबद्दलचा इतिहास मांडण्यात आला आहे. यात कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असे दाखवण्यात आले आहे. आता यावरुन गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक शिर्के यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.