‘…त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही’; ‘छावा’बद्दल मंत्री उदय सामंत यांची स्पष्ट भूमिका

विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यावर आक्षेप नोंदवला जातोय. त्यावरून आता मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

...त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; छावाबद्दल मंत्री उदय सामंत यांची स्पष्ट भूमिका
Chhaava trailer
Image Credit source: Youtube
| Updated on: Jan 26, 2025 | 2:47 PM

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा, त्याशिवाय प्रदर्शित करू नये,’ अशी भूमिका मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही,’ असाही इशारा त्यांनी दिला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

उदय सामंत यांचं ट्विट-

‘धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणं ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मतं व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

याआधी शुक्रवारी माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं होतं की, ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो इतिहासकारांना दाखवला पाहिजे, जेणेकरून त्याची अचूकता सुनिश्चित होईल. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका नृत्याच्या दृश्यावरून काहींनी आक्षेप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली. ट्रेलरमध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा लेझीम खेळतानाचा हा सीन होता.

‘छावा’ हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या आधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती, मात्र संपूर्ण भारतभर मोठ्या पातळीवर छत्रपती संभाजी महाराजांची कथा मांडण्यात दिग्दर्शक – निर्मात्यांना यश आलं नव्हतं. मात्र ‘छावा’च्या टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भव्य प्रतिसादामुळे हा चित्रपट मनोरंजनाच्या सर्व पातळीवर गाजण्याची शक्यता वर्तवली जातेय.