Chhaava Trailer: डोळ्यात पाणी.. अंगावर काटा; ‘छावा’चा ट्रेलर पाहून भारावले प्रेक्षक
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय. यामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.

अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी संध्याकाळी प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहासन स्वीकारलं. दख्खनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या औरंगजेबाच्या अधिपत्याखालील मुघलांविरुद्ध त्यांनी स्वराज्यासाठी युद्ध केलं. अत्यंत धाडसाची, साहसाची ही गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली असून त्याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी याआधी ‘मिमी’, ‘जरा हटके जरा बचके’ आणि ‘लुका छुपी’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. ट्रेलरमधील विकी कौशलचा रुद्रावतार पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तीन मिनिटं आठ सेकंदांच्या या ट्रेलरमधील चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाल्या आहेत. यामध्ये रश्मिका मंदाना ही छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्ना यांनी सर्वांनाच चकीत केलं आहे. यातील पार्श्वंसंगीत, ॲक्शन सीन्स, संवाद आणि एकंदर कलाकारांचा लूक अत्यंत दमदार असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.




या ट्रेलरवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘डोळ्यात पाणी, अंगावर काटा’, असं एकाने लिहिलं. तर ‘ट्रेलर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अशा प्रकारचे चित्रपट बनवायला हवेत’ अशीही इच्छा काहींनी व्यक्त केली. तर अनेकांनी हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार, अशीही खात्री व्यक्त केली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेता विकी कौशलच्या अभिनयकौशल्याचंही खूप कौतुक होतंय. अत्यंत समर्पणाने त्याने ही भूमिका साकारली, याचा अंदाज ट्रेलर पाहून येतो, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. ‘छावा’ हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या आधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती, मात्र संपूर्ण भारतभर मोठ्या पातळीवर छत्रपती संभाजी महाराजांची कथा मांडण्यात दिग्दर्शक – निर्मात्यांना यश आलं नव्हतं. मात्र ‘छावा’च्या टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भव्य प्रतिसादामुळे हा चित्रपट मनोरंजनाच्या सर्व पातळीवर गाजण्याची शक्यता वर्तवली जातेय.