‘छावा’ला फूट पाडणारा चित्रपट म्हणणाऱ्या रेहमान यांना लेखकाचं उत्तर; म्हणाले ‘रातोरात लोकांचे विचार..’

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटावर टीका केली होती. हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता चित्रपटाच्या लेखकाने प्रत्युत्तर दिलं आहे.

छावाला फूट पाडणारा चित्रपट म्हणणाऱ्या रेहमान यांना लेखकाचं उत्तर; म्हणाले रातोरात लोकांचे विचार..
AR Rahman and Chhaava
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 23, 2026 | 10:28 AM

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाबाबत संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी जे वक्तव्य केलं, त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. रेहमान यांनी ‘छावा’ला फूट पाडणारा चित्रपट म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. आता या संपूर्ण वादावर चित्रपटाचे लेखक ऋषी विरमानी यांनी आपली बाजू मांडली आहे. हा चित्रपट समाजात फूड पाडण्याचं काम करत असल्याच्या सर्व टीकांना त्यांनी स्पष्टपणे नाकारलं आहे. चित्रपट हे फक्त मनोरंजनाचं माध्यम आहे आणि लोकांच्या वर्षानुवर्षे जुन्या विचारांना रातोरात बदलू शकत नाही, असं ते म्हणाले.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत ऋषी पुढे म्हणाले, “मला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की अवघ्या काही तासांचा स्क्रीनटाइम एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण विचारधारेला किंवा विचारांना कसा काय बदलू शकतो? प्रेक्षक फार समजूतदार आहेत आणि त्यांची स्वतंत्र विचारशैली आहे. प्रेक्षकांनी ‘छावा’ला ज्याप्रकारे प्रतिसाद दिला, तसा बऱ्याच काळापर्यंत कुठल्या हिंदी चित्रपटाला मिळाला नव्हता. त्यामुळे मी खुश आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एक असं ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्यावर खूप आधीच चित्रपट बनायला पाहिजे होता. मला आशा आहे की हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर परदेशातही लोकांना आवडेल आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची कहाणी घराघरात पोहोचेल.”

विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटावर ‘विभाजनकारी’ असल्याची टिप्पणी केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाची गाणी रेहमान यांनीच संगीतबद्ध केली होती. ‘छावा’ या चित्रपटाचा विषय शौर्याबद्दल असला तरी तो फूट पाडणारा असल्याचं मत त्यांनी यावेळी नोंदवलं. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. ‘छावा’मध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई भोसले यांची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती.

बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत रेहमान म्हणाले होते, “हा एक फूट पाडणारा चित्रपट आहे. त्याच्या कथेचा गाभा शौर्य दाखवण्याचा असला तरी मला वाटतं की फूट पाडण्याच्या गोष्टीमुळे चित्रपटाला अधिक फायदा झाला. मी दिग्दर्शकांना विचारलं होतं की त्यांना या चित्रपटासाठी माझी गरज का आहे? तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की, आम्हाला या चित्रपटासाठी फक्त तुमची गरज आहे. चित्रपट चांगला असला तरी निश्चितच लोक त्यापेक्षा हुशार आहेत. तुम्हाला असं वाटतं का की लोक चित्रपट पाहून प्रभावित होतील? माझ्या मते लोकांकडे अंतर्गत विवेक नावाची काहीतरी गोष्ट असते, जी सत्य काय आहे आणि फेरफार काय आहे, यातील फरक जाणतो.”