रानडुक्कर, ससा, घोरपडसारख्या प्राण्यांचा मांस खाल्ल्याचा छाया कदमचा दावा; वनविभागाकडून चौकशी
अभिनेत्री छाया कदम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काही प्राण्यांचं मांस खाल्ल्याचा दावा केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून वनविभागाने चौकशीला सुरुवात केली आहे.

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री छाया कदम सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे अडचणीत सापडली आहे. छाया यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावरून वनस्पती आणि प्राणी कल्याण संस्थेनं ठाण्यातील वन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. “मी रानडुक्कर, ससा, घोरपड साळिंदर अशा प्राण्यांचं मांस खाल्लंय”, असं छायाने या मुलाखतीत म्हटलं होतं. यातील अनेक प्राणी हे संरक्षित वन्यजीवच्या यादीत येतात. त्यामुळे वन विभागाला या प्रकरणाचा चौकशी करण्यासाठी संबंधित संस्थेनं तक्रार केली आहे. इतकंच नव्हे तर याप्रकरणी छायावर आणि वन्य प्राण्यांची शिकार करण्यात किंवा खाण्यात सहभागी असलेल्या इतरांवर कायदेशीर कारवाई करण्यास त्यांनी सांगितलं आहे.
याविषयी विभागीय वन अधिकारी (दक्षता विभाग) रोशन राठोड म्हणाले, “आम्हाला छाया कदम यांच्याविरोधात तक्रार मिळाली आहे. मुख्य वनसंरक्षकांनी ती चौकशीसाठी उपवनसंरक्षकांकडे (DCF) पाठवली आहे. याप्रकरण लवकरच अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावलं जाईल.”
View this post on Instagram
छाया यांच्याविरोधाती तक्रारीत वनस्पती आणि प्राणी कल्याण संस्थेनं म्हटलंय, “आमच्या टीमने छाया कदमची एक मुलाखत पाहिली, ज्यामध्ये तिने उंदीर, हरण, ससे, रानडुक्कर, मॉनिटर सरडा आणि साळिंदर यांसारख्या संरक्षित वन्यजीव प्रजातींचं मांस खाल्ल्याचा दावा केला होता. यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो आणि हा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या विविध कलमांखाली हा गुन्हा ठरतो. आम्ही जैविक विविधता कायदा 2002 च्या संबंधित कलमांचा वापर करण्याची विनंतीदेखील करतो. संबंधित मुलाखतीला अपराधाची कबुली मानली पाहिजे. मांसाहारासाठी वन्यजीवांच्या शिकारीच्या या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिच्या आणि इतरांवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करतो.”
दरम्यान वनविभागाने याप्रकरणी छाया कदमला फोन करून विचारणा केली असता आपण कामानिमित्त बाहेर असून चार दिवसांनंतर भेटून सविस्तर भूमिका मांडेन, असं तिने स्पष्ट केलंय. छाया कदमने ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘न्यूड’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत नामांकनासाठी पाठवलेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं.
