
सिनेसृष्टीमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी करिअरची सुरुवात करुन 40 ते 45 वर्ष झाली आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण एक अभिनेता असा आहे ज्याने 47 वर्षांपूर्वी करिअरला सुरुवात केली होती. पण आजही तो सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याने ‘बॉर्डर 2’च्या वादळात 300 कोटी रुपयांचा सुपरहिट सिनेमा दिला आहे. आता हा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत त्याने बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या अभिनेत्याने अभिनय कारकिर्दीच्या पहिल्या दिवसाची आठवण करुन देत एक फोटो शेअर केला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून मेगास्टार चिरंजीवी आहे. 47 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासाला त्यांनी ‘चंदामामाच्या कथेसारखा’ सुंदर असल्याचे सांगत फिल्ममेकर्स आणि चाहत्यांचे आभार मानले. इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी भावुक होऊन आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या खास क्षणांची आठवण काढली. त्यांनी सांगितले की, ११ फेब्रुवारीला ४७ वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा आपल्या पहिल्या चित्रपट ‘पुनाधिरल्लू’साठी कॅमेरासमोर उभे राहिले होते. हा त्यांचा पहिला शूट केलेला सिनेमा होता. या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शक, निर्माते आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.
चिरंजीवी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर १९७९ च्या सेटवर काढलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी, “आज माझ्या आयुष्यातील तो पहिला दिवस, जेव्हा मी पहिल्या चित्रपट ‘पुनाधिरल्लू’साठी कॅमेरासमोर उभा राहिलो होतो.” त्यांनी सांगितले की, त्या दिवशी जो आनंद, उत्साह, जबाबदारी आणि भावना अनुभवल्या, त्या शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. तो क्षण आजही असा वाटतो जसे काल किंवा परवा घडला असावा. त्यांनी या अनुभवाची तुलना चंदामामाच्या कथेशी केली.
पहिली संधी देणाऱ्यांचे आभार
चिरंजीवी यांनी पुढे लिहिले, “या खास निमित्ताने मी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी मला माझी पहिली संधी दिली. त्यांच्या विश्वासाने आणि प्रोत्साहनाने माझ्या अभिनय प्रवासाची पायाभरणी झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत, ज्या सर्व प्रेक्षकांनी मला पाठिंबा दिला आणि आशीर्वाद दिला, त्यांचेही आभार.”
१९७९ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाला मिळाले अनेक पुरस्कार
चित्रपट ‘पुनाधिरल्लू’ (Foundation Stones) १९७९ मध्ये रिलीज झाला होता. याचे दिग्दर्शन गुडापती राजकुमार यांनी केले होते आणि निर्मिती क्रांती कुमार यांनी केली होती. हा चिरंजीवी यांचा पहिला शूट केलेला सिनेमा असली तरी त्यांचा पहिला रिलीज झालेला सिनेमा ‘प्रणाम खरीदु’ होता. ‘पुनाधिरल्लू’चे खूप कौतुक झाले आणि या चित्रपटाने दोन नंदी पुरस्कार जिंकले. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा नंदी पुरस्कार मिळाला, तर अभिनेते गोकिना रामा राव यांना त्यांच्या अभिनयासाठी बेस्ट अॅक्टरचा नंदी पुरस्कार मिळाला.
२०२६ मध्ये ३०० कोटींचा सिनेमा
सुपरस्टार चिरंजीवी यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मना शंकरा वरा प्रसाद गारु’ १२ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा ‘बॉर्डर २’ज्या वेळी प्रदर्शित झाला होता त्याच वेळी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २९६.१ कोटींचे कलेक्शन केले. तर चित्रपटाचा बजेट फक्त २०० कोटींचा होते. भारतात या चित्रपटाची कमाई २१४.३५ कोटी इतकी होती.