CID च्या दयाकडून ‘तारक मेहता..’ची पोलखोल; सेटवर कलाकारांचं खरं रुप..
'सीआयडी' या मालिकेत इन्स्पेक्टर दयाची भूमिका साकारलेली अभिनेता दयानंद शेट्टी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'तारक मेहता..' या मालिकेबद्दल नाव न घेता धक्कादायक खुलासा केला आहे. सेटवरील वातावरण कसं होतं, याविषयी त्याने सांगितलं आहे.

‘सीआयडी’ या मालिकेत दयाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता दयानंद शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. या मुलाखतीत दयानंदने थेट मालिकेचं नाव घेतलं नसलं तरी त्याच्या प्रतिक्रियेवरून चाहत्यांना खात्री पटली की तो ‘तारक मेहता..’ या मालिकेबद्दलच बोलत आहे. याविषयी दया म्हणाला, “एक मालिका आहे, ज्याचा उल्लेख मी करणार नाही. कारण ती खूप लोकप्रिय विनोदी मालिका आहे. आपली अपेक्षा असते की एक विनोदी मालिका असल्यामुळे त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धी असेल. कलाकार सेटवर पण एकमेकांसोबत हसत-खेळत असतील. पण सेटवर त्याच्या उलट वातावरण होतं. कलाकार एकमेकांकडे बघतही नव्हते आणि बोलतही नव्हते.”
आपला अनुभ सांगताना दयानंद शेट्टीने सांगितलं, “आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो आणि कॅमेरासमोर जे काही कॉमेडीचे सीन्स शूट व्हायचे, त्यानंतर सर्वांचे चेहरे खूप गंभीर होत असत. सेटवरची लोकं एकमेकांकडे पाहतसुद्धा नव्हते, बोलतही नव्हते. सर्वजण आपापल्या खोलीत गेले होते. एका विनोदी मालिकेतील कलाकारांची अशी अवस्था होती.” सीआयडी आणि तारक मेहता का उल्टा चष्मा या दोन्ही मालिकांच्या टीमने अनेक भागांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यामुळे दया हे सर्व ‘तारक मेहता..’बद्दलच बोलतोय, असं चाहत्यांनी म्हटलंय.
पहा व्हिडीओ-
The dark reality of Taarak Mehta show . No doubt, many senior actors are leaving the show despite being paid well. pic.twitter.com/7Sanbd19ZO
— Byomkesh (@byomkesbakshy) July 31, 2026
दयाने पुढे स्पष्ट केलं की, “त्या विनोदी मालिकेच्या सेटवरचं वातावरण थोडं गंभीर असलं तरी सीआयडीच्या सेटवरील पडद्यामागील गोष्टी मात्र खूपच वेगळ्या होत्या. सीआयडी ही एक क्राइम ड्रामा मालिका असूनही आम्ही नेहमीच हसत-खेळत काम करायचो.” दयाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तारक मेहता.. या शोचं हे कटू सत्य आहे. यात काहीच शंका नाही. भरघोस मानधन मिळत असूनही त्यातील अनेक कलाकार मालिका सोडून जात आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा नक्कीच तारक मेहता.. या मालिकेबद्दल बोलतोय’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अठरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षांत या मालिकेतील बरेच कलाकार सोडून गेले आहेत. तर काहींनी निर्मात्यांवर गंभीर आरोपसुद्धा केले आहेत.