
महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान फटाके फोडल्यामुळे मुंबईतील वांद्रे पूर्व भागात एका घराला आग लागल्याच्या वृत्तानंतर अभिनेत्री डेझी शाहने तीव्र संताप व्यक्त केला आहे. रात्रीच्या वेळी डेझी जेव्हा तिच्या श्वानाला घेऊन इमारतीबाहेर फिरत होती, तेव्हाच ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत डेझीने निवडणूक प्रचार करणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना सवाल केला आहे. हे वर्तन बेजबाबदार असल्याची टीका तिने कार्यकर्त्यांवर केली आहे. इतकंच नव्हे तर आगीसाठी जबाबदार असलेले लोक तिथून पळून गेले, परंतु रहिवाशांना त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत, असाही खुलासा तिने केला.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये डेझीने लिहिलंय, “माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी पथकं/टीम्स नियुक्त करता, तेव्हा कृपया त्यांच्यात काही सामान्य ज्ञान असल्याची खात्री करा. सुदैवाने माझ्या इमारतीत प्रचारकांना घरोघरी जाण्याची परवानगी नाकारली होती. परंतु रहिवाशांच्या घरांजवळ फटाके फोडणं हा प्रचाराचा मार्ग अजिबात योग्य नाही. ही परिस्थिती नागरी जाणीवेच्या अभावामुळे उद्भवली आहे. बुद्धीहीन लोकांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. लोक सार्वजनिक सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करत आहेत.”
प्रचंड संतापलेली डेझी तिच्या या व्हिडीओत म्हणतेय, “निवडणुकीच्या प्रचारासाठी काही लोक इथे आले होते. त्यांनी रस्त्यावर फटाके फोडले आणि त्या फटाक्यांमुळे इमारतीतील एका घराला आग लागली आहे. हे मूर्ख सरकारी लोक प्रत्येक इमारतीत प्रचारासाठी येत आहेत आणि इमारतीबाहेर फटाके फोडत आहेत. ज्या इमारतीला आग लागली, त्याच्या बाजूलाच माझी इमारत आहे. हे भयानक आहे.” डेझीने तिच्या इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, ‘जे चूक आहे ते चूकच आहे.’ या व्हिडीओमध्ये तिने स्पष्ट केलं की आता निवडणुकीचा काळ आहे, प्रचार सुरू आहेत हे समजण्यासारखं आहे. पण प्रचारादरम्यान फटाके फोडलेच पाहिजेत असा कोणताही नियम नाही.
डेझी शाहने 2014 मध्ये सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी ती गणेश आचार्य यांच्याकडे सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करायची. डेझी डान्सर आणि कोरिओग्राफरसुद्धा आहे.