
आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली पूर्व अभिनेत्री झायरा वसिमने धर्माचं कारण देत अभिनयक्षेत्र कायमचं सोडलं. 2019 मध्ये झायराने ग्लॅमरचं विश्व सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. झायराने तिच्या निकाहचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. झायराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत ‘कुबूल है X 3’ असं कॅप्शन देत. यामध्ये झायरा आणि तिच्या पतीचा पाठमोरा फोटो पहायला मिळत आहे.
झायराने जरी तिच्या पतीचं नाव किंवा ओळख लपवली असली तरी निकाह नाम्यात तिच्या पतीचं नाव हैदर असल्याचं पहायला मिळतंय. हैदर याच नावाने तिच्या पतीने निकाह नाम्यावर स्वाक्षरी केली आहे. झायरा तिच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर फारशी व्यक्त होत नाही. त्यामुळे पतीची ओळखही तिने जगजाहीर करणं टाळलंय. झायराने फोटो पोस्ट केल्यानंतर तिचा पती आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
24 वर्षीय झायराने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये ती निकाह नाम्यावर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. यावेळी तिच्या हातावर सुंदर मेहंदी काढल्याचं पहायला मिळत आहे. तर झायराच्या साखरपुड्याची अंगठीसुद्धा यात स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये नवविवाहित झायरा आणि तिचा पती पाठमोरे उभे आहेत आणि ते चंद्राकडे पाहत आहेत. यावेळी झायराच्या डोक्यावर लाल रंगाचा दुपट्टा दिसत असून तिच्या पतीने क्रीम कलरची शेरवानी घातली आहे.
झायरा वसिमने 2016 मध्ये ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने रेसलर गीता फोगाटच्या लहानपणाची भूमिका साकारली होती. आमिर खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. तर झायराला तिच्या दमदार अभिनयासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने 2017 मध्ये पुन्हा एकदा आमिर खानसोबत ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. 2019 मध्ये ती प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्यासोबत ‘द स्काय इज पिंक’ हा तिच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्र कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला होता.