
आदित्य धर याचा ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस उलटले असून हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवतोय. चाहत्यांनी तर या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहेच, पण अनेक सेलिब्रिटीही धुरंधरचं, त्यातील कलाकारांचं कौतुक करताना थांबत नाहीयेत. रणवीर सिंग (Ranveer Singh) , अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन या सगळ्यांचंच काम लोकांना आणि सेलिब्रिटींना आवडलं आहे. यातील रेहमान डकैतच्या व्यक्तिरेखेचं पर्यायाने अक्षय खन्नाचं प्रचंड कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिने अक्षय खन्नाची (Akshaye Khanna) तारीफ करत त्याला ऑस्कर देण्याची मागणी केली होती.
तसेच भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही ‘धुरंधर’ पाहून रिव्ह्यू दिला होता. ‘एक कथाकार म्हणून, आदित्य धर एक हुशार कारागीर आहे आणि एक उत्तम संशोधक देखील आहे. मृत मुलाचा चेहरा पाहताना अक्षय खन्नाच्या चेहऱ्यावरचे भाव हे त्याच्या दर्जेदार अभिनयाचं जिवंत उदाहरण आहे आणि रणवीरचे बोलके डोळे, काहीच न बोलता बरंच काही सांगून जातात, ज्यांना आपला वारसा पुढे न्यायचा आहे, त्यांनी हे (चित्रपट) पाहणं गरजेच आहे ‘ असं स्मृती इराणी यांनी म्हटं होतं. हा चित्रपट पाहून काही काळ झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा अक्षय खन्नाचं कौतुक केलं असून त्याला ऑस्कर देण्याचीही मागणी केली आहे.
अक्षय खन्नाची कमाल
‘धुरंधर’ चित्रपटातील अक्षय खन्नाच्या डान्सची क्लिप,त्याचा परफॉर्मन्स व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्स त्याचा ‘तीस मार खां’ (2010) चित्रपट पुन्हा बघत आहेत. या चित्रपटात ठग दाखवलेला अक्षय कुमार स्वत:ला डायरेक्टर म्हणवतो आणि अभिनेत्याच्या रोलमध्ये असलेल्या अक्षय खन्नाला ऑस्कर पुरस्कार जिंकण्याचं स्वप्न दाखवतो, तो त्याला वारंवार ‘सुपरस्टार’ म्हणत असतो.
आता अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ‘तीस मार खां’ मधील तीच क्लिप त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीद्वारे शेअर केली असून एक कॅप्शनी लिहीली आहे, ” जेव्हा अक्षय खन्नाने (उत्तम अभिनयाने) सर्व अपेक्षा पार केल्यात आणि तेव्हा तुम्हालाही म्हणावसं वाटतं – दे दो ऑस्कर” अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी त्याचं पुन्हा कौतुक केलं आहे.
मार्च महिन्यात रिलीज होणार ‘धुरंधर 2’
या चित्रपटात अक्षय खन्ना ला रेहमान डकैतच्या भूमिकेत पाहिल्यानंतर चाहत्यांनाही असंच काहीसं वाटत आहे. स्मृती इराणी यांच्याव्यतिरिक्त, अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिनेही आज सोशल मीडियावर “धुरंधर” चं कौतुक केलं. आदित्य धरच्या चित्रपटाचा रिव्ह्यू करताना समांथाने लिहिलं, “धुरंधर पाहिल्यानंतरही मी एक्सायडेट आहे. मोठ्या स्क्रीनचा अनुभव आणि थ्रील कमाल आहे. खरंच शानदार. आदित्य धरचं खूप खूप अभिनंदन. अक्षय खन्नाचा जबरदस्त परफॉर्मन्स. अर्जुनचं (रामपाल) काम पाहून अंगावर काटा आला. आर. माधवन नेहमीच सरप्राईज देतो. संजय दत्तने तर आग लावली ” असं समंथाने लिहीलं आहे. चाहत्यांना आता ‘धुरंधर 2’ ची उत्सुकता असून हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे.