‘ते’ गाणं ऐकताच मंडप सोडून गेला नवरदेव; आता करण जोहरने दिली प्रतिक्रिया
एखाद्या गाण्याशी आपल्या भावना जोडलेल्या असतात. परंतु गाण्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेणार का? पण प्रत्यक्षात असं घडलंय. लग्नसमारंभात डीजेवाल्याने ते एक गाणं वाजवल्यानंतर नवरदेवाने थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एखाद्या गाण्यावरून कोणाचं लग्न मोडल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? ही गोष्ट ऐकायलाही विचित्र वाटते. परंतु खऱ्या आयुष्यात असं घडलंय आणि या घटनेवर प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर हा किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. लग्नात डीजेवाल्याने ‘चन्ना मेरेया’ हे गाणं वाजवल्याने दिल्लीतल्या नवरदेवाने चक्क लग्नच मोडलंय. याबद्दलची पोस्ट करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली अन् त्यावर प्रतिक्रिया लिहिली आहे.
या पोस्टमध्ये रणबीर कपूरचा चित्रपटातील फोटो दिसत असून त्यावर लिहिलंय, ‘डीजेवाल्याने चन्ना मेरेया गाणं वाजवल्यानंतर दिल्लीतील नवरदेव त्याच्या लग्नातून निघून गेला.’ हीच पोस्ट शेअर करत करणने त्यावर लिहिलं, ‘Huh..???’ करणने या पोस्टवर आश्चर्य व्यक्त केलंय. असंही काही घडू शकतं यावर त्याचा विश्वास बसत नाहीये.

2016 मध्ये करण जोहर निर्मित ‘ऐ दिल है मुश्कील’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये जेव्हा अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या प्रियकरासोबत लग्न करते, तेव्हा तिच्या लग्नात अभिनेता रणबीर कपूर ‘चन्ना मेरेया’ हे गाणं गातो. चित्रपटात रणबीरचं अनुष्कावर प्रेम असतं, परंतु ती दुसऱ्यासोबत लग्न करते. हे भावनिक गाणं ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. हेच गाणं ऐकून नवरदेव भावनिक झाला, कारण त्याला त्याच्या पूर्व प्रेयसीची आठवण आली. म्हणून त्याने लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.
यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत निर्मित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, फवाद खान आणि ऐश्वर्या राय यांच्या भूमिका आहेत. मैत्री आणि प्रेम या संकल्पनांवर आधारित या चित्रपटाने भारतात 150 कोटी आणि जगभरात जवळपास 237 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यातील ‘ब्रेकअप कर लिया’, ‘बुलेया’, ‘क्युटीपाय’, ‘चन्ना मेरेया’ ही गाणी विशेष गाजली होती. ‘चन्ना मेरेया’ हे गाणं गायक अरिजीत सिंगने गायलं आहे. या गाण्यावरून सोशल मीडियावर बरेच मीम्ससुद्धा व्हायरल होतात.
