
Dharmendra 90th Birthday : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांचं निधन झालं. सांगायचं झालं तर, कुटुंबिय धर्मेंद्र यांचा 90 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करणार होते. पण त्याआधी त्यांचं निधन झालं. आता धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी कुटुंबियांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. देओल कुटुंब आता त्यांचा वाढदिवस खंडाळा येथील त्यांच्या फार्महाऊसवर साजरा करेल. यावेळी धर्मेंद्र यांचे चाहतेही त्यांना श्रद्धांजली वाहू शकतील.
रिपोर्टनुसार, सनी देओल आणि बॉबी देओल यांनी वडील धर्मेंद्र यांच्या स्मृती आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या फार्महाऊसला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनाही श्रद्धांजली वाहता यावी अशी कुटुंबियांची इच्छा आहे. म्हणूनच, त्यांनी कुटुंबाला भेटण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी फार्महाऊसचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कुटुंबियांनी तयारी देखील सुरु केली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात फार्महाऊसवर दुपारी 12.30 वाजता सुरु होणार आहे. येथे धर्मेंद्र यांचे चाहते देखील थेट पोहोचू शकतात… यासाठी चाहत्यांना कोणत्या पासची किंवा रजिस्ट्रेशनची गरज भासणार नाही.. लोणावळ्याला चाहत्यांना घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. हा एक भव्य सोहळा नाही, तर धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त एक शांत आणि भावनिक श्रद्धांजली आहे.
धर्मेंद्र गेल्या काही काळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. 10 नोव्हेंबर रोजी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या काळात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांच्या मृत्यूच्या बातम्या माध्यमांमध्येही आल्या, परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी त्या नाकारल्या. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि डॉक्टरांनी घरीच पुढील उपचारांचा सल्ला दिला. पण 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं.
धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत झाले. यावेळी सलमान खान, संजय दत्त, अमिताभ बच्चन, आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. सनी देओलचे मॅनेजर पंकज जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओलचा मुलगा करणने आजोबांच्या अस्थींचे विधीवत गंगेत विसर्जन केलं.