Deool Band 2: या देशात सगळं ओरिजिनल, डुप्लिकेट फक्त शेतकरीच..; अंगावर काटा आणणारा ‘देऊळ बंद 2’चा ट्रेलर

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'देऊळ बंद 2' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता परीक्षा देवाची.. या टॅगलाईनसह हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये शेतकऱ्यांचा अत्यंत ज्वलंत विषय अधोरेखित करण्यात आला आहे.

Deool Band 2: या देशात सगळं ओरिजिनल, डुप्लिकेट फक्त शेतकरीच..; अंगावर काटा आणणारा देऊळ बंद 2चा ट्रेलर
Deool Band 2 Trailer
Image Credit source: Youtube
| Updated on: May 19, 2026 | 10:30 AM

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरून देवालाच आव्हान देणाऱ्या प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2015 मध्ये ‘देऊळ बंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व इतिहास घडवला होता. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आला असून ‘देऊळ बंद 2’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि डोळ्यात अंजन घालणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या 21 मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

2 मिनिटं 22 सेकंदांच्या या ट्रेलरची सुरुवातच ‘ओ अनंतकोटी ब्रह्मांडनायक..तुमचं अस्तित्व आहे?’ या सवालाने होते. ‘आता परीक्षा देवाची..’ या टॅगलाइनसह चित्रपटाची घोषणा झाली होती. देवाला ही नेमकी कोणती परीक्षा द्यावी लागणार आहे, याची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळतेय. ‘देऊळ बंद 2’चं कथानक सामाजिक वास्तव, श्रद्धा आणि मानवी संघर्ष या विषयांवर प्रकाश टाकणारं आहे. या ट्रेलरमध्ये शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीतील ज्वलंत समस्या, त्यांच्या समोरील आर्थिक संकट आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आलं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अध्यात्म यांमधील संघर्षासोबतच या ट्रेलरमध्ये देवाचं अस्तित्व आणि सामाजिक उत्तरदायित्व यांविषयीची मांडणी अत्यंत प्रभावीपणे करण्यात आली आहे.

पहा ट्रेलर-

“बाईच्या मनाची खोली मोजू नको बाबा त्यात शेतकऱ्याची…”, “या देशात सगळं ओरिजनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी”, यांसारखे ट्रेलरमधील संवाद थेट मनाला भिडतात आणि चित्रपटाची संवेदनशीलता अधोरेखित करतात. इथं देवालाच त्याच्या अस्तित्वाची आणि कृपेची परीक्षा देण्याचं थेट आव्हान देण्यात आलं आहे. या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढवली आहे. या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

या चित्रपटाचं कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं असून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे पुन्हा एकदा ‘स्वामी समर्थांच्या’ दैवी भूमिकेत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहेत. त्यांच्यासोबत स्नेहल तरडे, आणि स्वतः प्रवीण तरडे सदूशेठ नावाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Follow Us