अभिनेत्रीच्या 7 महिन्यांच्या मुलाला बोलले ‘छोटा दहशतवादी’; संतापून उचललं हे पाऊल
या अभिनेत्रीने नुकतेच तिच्या मुलासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यावर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी ट्रोलिंगला सुरुवात केली. मुलगा किती काळा दिसतो, छोटा दहशवादी.. असे हिणवणारे कमेंट्स वाचून अभिनेत्री चिडली.

‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या मुलाचे फोटो पोस्ट केले. या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी काही कमेंट्स तिच्या सात महिन्यांच्या मुलावर रंगावरून हिणवणारेही आहेत. ‘किती काळा दिसतो हा’, ‘छोटा आतंकवादी’ असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. त्यावरून आता देवोलीनाने सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्रोल करणाऱ्यांच्या आयडीचे स्क्रीनशॉट शेअर करत तिने त्यांना चांगलंच फटकारलं आहे.
देवोलीना भट्टाचार्जीने नुकताच तिच्या मुलाचा सात महिन्यांचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त तिने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट होते. हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर काही युजर्सनी तिच्या मुलाच्या वर्णावरून टीका करण्यास सुरुवात केली. यामुळे देवोलीना दुखावली गेली. तिने या कमेंट्सना फक्त उत्तरच दिलं नाही तर ट्रोलर्सचे प्रोफाइल शेअर करून त्यांचा पर्दाफाशही केला. ‘बाप पर गया है बेटा’ असं म्हणणाऱ्याला देवोलीनाने उत्तर दिलं, ‘का? तू तुझ्या शेजाऱ्यावर गेला आहेस का?’ यापुढे तिने त्याची पोलखोलसुद्धा केली आहे. ‘हा माणूस दिल्लीचा एक इंजीनिअर आहे. तो कोणत्या प्रकारचा इंजीनिअर आहे, हे फक्त त्यालाच माहिती आहे. इंजीनिअर होण्यासाठी इतके पैसे खर्च करूनही त्याचं आयुष्य आणि विचारसरणी सुधारली नाही. कारण जर त्याच्यासारखा इंजीनिअर असेल तर भविष्य कोणत्या दिशेने जातंय, हे तुम्ही समजू शकता.’
View this post on Instagram

दुसऱ्या ट्रोलरवर टीका करताना तिने लिहिलं, ‘आता मी तिच्याबद्दल काय बोलावं? ती स्वत: एक आई आहे. मी देवाकडे प्रार्थना करते की तिचं मूल अशा गोष्टींना बळी पडू नये.’ एका युजरने मर्यादा ओलांडत देवोलीनाच्या मुलाच्या फोटोवर थेट लिहिलं, ‘छोटा दहशतवादी’. त्यावर देवोलीनाने म्हटलंय, ‘हे संगीतकार आहेत, त्यांच्याशी संबंधित संगीतकारांना देव आशीर्वाद देवो. ते स्वत:ला टॅग करू देत नाहीत, परंतु त्यांची छोटी मानसिकता ते खूप चांगल्या प्रकारे दाखवतात.’
देवोलीनाने जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी आंतरधर्मीय लग्न केलंय. गेल्या वर्षी तिने मुलाला जन्म दिला. देवोलीना आणि शाहनवाज यांनी त्यांच्या मुलाचं नाव जॉय असं ठेवलंय.
