
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या दोघांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यानंतर एका निर्मात्याने त्यांच्यावरच अपहरणाचा गंभीर आरोप केला. याप्रकरणी पूजा आणि कुणाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पूजाने ‘देवों के देव महादेव’ या पौराणिक मालिकेत पार्वतीची भूमिका साकारली होती. या सर्व आरोपांवर पूजाने मौन सोडलं आहे. अपहरण, फसवणूक आणि खंडणीच्या आरोपांमुळे लोकांच्या द्वेषाचा सामना करावा लागत असल्याचं तिने म्हटलंय. इतकंच नव्हे तर यामुळे काम मिळणंही अवघड झाल्याचा खुलासा तिने केला. पूजाने तिच्यावरील आणि तिच्या पतीवरील आरोप फेटाळले आहेत.
‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, “ज्या माणसाने आमची आर्थिक फसवणूक केली, त्याच माणसाने आता आमच्यावर अपहरणाचा खोटा आरोप केला आहे. निर्माता श्याम सुंदर आमचे पैसे घेऊन फरार झाला होता. जेव्हा आम्ही आमचे पैसे परत मागितले, तेव्हा त्यानेच उलट आमच्यावर खोटे आरोप केले. पोलीस आपलं काम करत आहेत. आम्ही चुकीचे नाही आहोत, म्हणूनच आम्हाला जाऊ दिलं.” यावेळी कुणालनेही त्याची बाजू स्पष्ट केली. “मला पाकिस्तान, लंडन आणि आफ्रिकेतून कॉल्स येत आहेत. आम्हाला मानसिकदृष्ट्या टॉर्चर केलं जातंय. आम्ही खूप सहन करतोय. आज आम्ही अशा परिस्थितीत पोहोचलोय, जिथे माझ्या मुलाने काही मागितलं, तर त्याला मी ते देऊ शकत नाही. कारण मला कर्ज फेडायचं आहे”, असं तो म्हणाला.
या सर्व समस्यांमुळे मुलाच्या शाळेची फी भरायलाही पैसे नसल्याचं कुणालने सांगितलं आहे. याविषयी तो पुढे म्हणाला, “माझ्याकडे माझ्या मुलाच्या शाळेची फी भरायलाही पैसे नाहीत. खरं सांगायचं झालं तर त्याच्या शाळेची फी त्याच्या मामाने भरली आहे. या कठीण काळात बरीच लोकं आमच्या मदतीला धावून आले आहेत. माझ्याकडचे सर्व दागिनेसुद्धा बँकेत आहेत, कारण मला लोकांचे पैसे परत द्यायचे आहेत. या सगळ्या वादाचा परिणाम माझ्या कामावर होतोय.”
बंगाली चित्रपट निर्माता श्याम सुंदर डे यानं पूजा आणि कुणालवर गंभीर आरोप केले आहेत. गोव्यात माझं अपहरण केलं आणि माझा छळ केला, अशी तक्रार त्याने केली होती. इतकंच नव्हे तर श्यामची पत्नी मालविका डेनं पूजा आणि कुणालविरोधात एफआयआर दाखल केली होती.