पत्नी हेमा मालिनी ट्रोल होताच धर्मेंद्र यांनी विनेश फोगटसाठी लिहिली खास पोस्ट

ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलमध्ये कुस्तीगीर विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर खासदार हेमा मालिनी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावरून त्यांना नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. आता हेमा यांचे पती आणि अभिनेते धर्मेंद्र यांनी विनेशसाठी पोस्ट लिहिली आहे.

पत्नी हेमा मालिनी ट्रोल होताच धर्मेंद्र यांनी विनेश फोगटसाठी लिहिली खास पोस्ट
Dharmendra and Hema Malini on Vinesh Phogat
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 08, 2024 | 1:33 PM

अवघ्या 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे भारताची अनुभवी कुस्तीगीर विनेश फोगटचं ऑलिम्पिक सुवर्णपदकाचं स्वप्न अधुरंच राहिलं. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशने अंतिम फेरीच्या दिवशी, बुधवारी वजन अधिक भरल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून थेट अपात्र ठरवण्यात आलं. या धक्कादायक घटनेनंतर देशभरातील तिच्या लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. राजकीय क्षेत्रातूनही यावर विविध प्रतिक्रिया आल्या. अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी विनेश फोगटबद्दल दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर विशेष चर्चेत राहिली. यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकासुद्धा केली. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते आणि हेमा मालिनी यांचे पती धर्मेंद्र यांनी विनेशसाठी पोस्ट लिहिली आहे.

धर्मेंद्र यांची पोस्ट-

‘डार्लिंग कन्या विनेश, तुझ्याबद्दलची बातमी ऐकून आम्ही खूप दु:खी आहोत. तू या मातीतील शूर साहसी कन्या आहेस. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आम्ही नेहमी प्रार्थना करतो. तुझ्या कुटुंबासाठी आणि जवळच्या प्रिय व्यक्तींसाठी तू नेहमी खुश आणि निरोगी राहा’, असं धर्मेंद्र यांनी लिहिलंय.

हेमा मालिनी काय म्हणाल्या होत्या?

विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर माध्यमांशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, “100 ग्रॅममुळे विनेश फोगट ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र ठरली. यावरून समजतं की आपलं वजन योग्य ठेवणं किती गरजेचं आहे. या घटनेवरून आपण ही शिकवण घेतली पाहिजे की वजन योग्य ठेवणं किती महत्त्वपूर्ण असतं. विशेषकरून आम्हा सर्व कलाकारांना आणि महिलांना वजनाबाबत सजन राहण्याची खूप गरज आहे. 100 ग्रॅम जास्त वजनाने किती फरक पडतो पहा. विनेश अपात्र ठरल्याने आम्ही खूप दु:खी आहोत. मला हेच वाटतं की तिने 100 ग्रॅम वजन लगेच कमी करावं, पण आता तिला खेळण्याची संधी मिळणार नाही.”

ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत प्रत्येक वजनी गटाची स्पर्धा दोन दिवस चालते. या दोन्ही दिवशी मल्लांचं सकाळी 8 वाजता वजन घेतलं जातं. पहिल्या दिवशी स्पर्धेला सुरुवात होताना विनेशचं वजन 49.9 किलो भरलं होतं. मात्र तीन लढती खेळल्यानंतर विनेशचं वजन 52.7 किलो झालं होतं. हे वजन कमी करण्यासाठी विनेशने अथक परिश्रम घेतलं होतं. रात्रभर न झोपता, पाणी न पिता, सातत्याने जॉगिंग करत, दोरीवरच्या उड्या मारत, सायकलिंग, सॉना बाथ घेत तिने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र बुधवारी सकाळी तिचं वजन 50.100 ग्रॅम भरलं. त्यामुळे ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धा समितीने नियमानुसार तिला अपात्र ठरवलं.