22 वर्षांनी मोठ्या हिरोशी रोमान्स करणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री? वयातील अंतरावरून पुन्हा वाद
'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' या दोन्ही चित्रपटांनंतर अभिनेत्री सारा अर्जुन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. रणवीरसोबतच्या तिच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर आता ती तिच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी ऑनस्क्रीन रोमान्स करणार असल्याचं कळतंय.

मोठ्या वयाचा अभिनेता आणि कमी वयाची अभिनेत्री.. हे समीकरण सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्रास पहायला मिळतंय. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांमध्ये यलिनाची भूमिका साकारलेली अभिनेत्री सारा अर्जुन यामुळे विशेष चर्चेत आली आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या रणवीर सिंहसोबत काम केलं होतं. यावरून दोघांना ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सारा अर्जुन पुन्हा एकदा तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या हिरोसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा हिरो दुसरा-तिसरा कोणी नसून साऊथ सुपरस्टार धनुष आहे. या दोघांच्या चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. परंतु त्यांच्यातील वयातील अंतरावरून सोशल मीडियावर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
सारा अर्जुन आणि धनुष यांच्या वयात 22 वर्षांचं अंतर आहे. सारा 20 वर्षांची असून धनुष 42 वर्षांचा आहे. चित्रपटात या दोघांमधील रोमान्स दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तमिलरसन पचमुथू या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतंय. निर्मात्यांची पहिली पसंत खरंतर ‘कांतारा: चाप्टर 1’ फेम रुक्मिणी वसंत होती. परंतु ती तिच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याने नंतर सारा अर्जुनला ऑफर देण्यात आली. जर सर्व गोष्टी जुळून आल्या तर सारा आणि धनुष पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील.
वयातील अंतरावरून होणाऱ्या चर्चांबद्दल साराने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली होती, “सगळा गोंधळ सोशल मीडियावरच आहे ना? मी तिथे फार सक्रिय नाही. मी त्यात फार सहभागी होत नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र मत असतं, असं मला वाटतं. जगा आणि जगू द्या.. यावर माझा विश्वास आहे. लोकांची मतं वेगळी असू शकतात. पण त्यामुळे माझ्या विचारांमध्ये काही फरक पडत नाही. मला कथेबद्दल माहिती होती. वयातील अंतर गरजेचं होतं हे मला माहीत होतं.”
सारा अर्जुनने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. दाक्षिणात्य अभिनेता राज अर्जुनची ती मुलगी आहे. ‘धुरंधर’मुळे तिला जगभरात ओळख मिळाली. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ती मोठी स्टार बनली आहे. ‘धुरंधर’मध्ये सारा अर्जुनने रणवीरची पत्नी यलिनाची भूमिका साकारली होती.