20 वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत का केला रोमान्स? ‘धुरंधर’ फेम अभिनेत्रीचं सहज उत्तर
'धुरंधर' हा चित्रपट जरी ब्लॉकबस्टर ठरला असला तरी त्यातील सारा अर्जुन आणि रणवीर सिंह या जोडीच्या वयातील अंतरावरून अजूनही ट्रोलिंग सुरूच आहे. यावर आता खुद्द सारा अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे. टीकाकारांना तिने सहज शब्दांत उत्तर दिलं आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला टीझर जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला, तेव्हा त्यातील रणवीर सिंह आणि सारा अर्जुन या जोडीच्या वयातील अंतराबद्दल सर्वाधिक चर्चा झाली. सारा ही रणवीरपेक्षा वयाने 20 वर्षांनी लहान आहे. आता चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर साराने यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत साराने हेसुद्धा स्पष्ट केलं की, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच ती सोशल मीडियापासून दूर आहे. फार क्वचित आणि कामापुरतंच ती सोशल मीडियाचा वापर करते.
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, “सगळा गोंधळ सोशल मीडियावरच आहे ना? मी तिथे फार सक्रिय नाही. मी त्यात फार सहभागी होत नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र मत असतं, असं मला वाटतं. जगा आणि जगू द्या.. यावर माझा विश्वास आहे. लोकांची मतं वेगळी असू शकतात. पण त्यामुळे माझ्या विचारांमध्ये काही फरक पडत नाही. मला कथेबद्दल माहिती होती. वयातील अंतर गरजेचं होतं हे मला माहीत होतं.”
View this post on Instagram
“मी सोशल मीडियापासून लांबच राहणं पसंत करते. सोशल मीडियावरील बातम्या वाचायची गोष्ट असेल तर हे सर्व चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी सुरू होतं. त्यावेळी मी क्वचितच सोशल मीडिया वापरायचे. माझं शिक्षण एका बोर्डिंग स्कूलमध्ये झालं आहे. तिथे शिकताना आम्हाल कोणतंही गॅझेट वापरण्याची मुभा नव्हती. शाळेनंतर मी इतकी व्यस्त झाले की मला आता त्या गोष्टीची सवयच आहे. म्हणून मला सोशल मीडियाची इतकी सवय नाही. जेव्हा मला खरंच गरज असते, तेव्हाच मी त्याचा वापर करते. अन्यथा मनोरंजनासाठी मी दुसऱ्या गोष्टींना निवडते. मोकळ्या वेळेत मी फिरायला जाते”, असं साराने सांगितलं.
सारा अर्जुन ही अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून ‘धुरंधर’ हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. याआधी साराने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ती काही जाहिरातींमध्येही झळकली होती. दीड वर्षांची असताना साराने एका जाहिरातीत काम केलं होतं. त्यानंतर ती जवळपास 100 जाहिरातींचा भाग बनली.
