Dhurandhar : धुरंधर चित्रपट, खऱ्या जावेद खानानीचा पाकिस्तानात मृत्यू कसा झालेला? मृत्यूची वेळ प्रश्न का निर्माण करते?
Dhurandhar : धुरंधर चित्रपटात जावेद खानानी आणि अल्ताफ खानानी ही पात्र दाखवली आहेत. यातल्या खऱ्या जावेद खानानीचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात जावेद खानानीचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला. त्याच्या मृत्यूची वेळ अनेक प्रश्न का निर्माण करते? जाणून घ्या त्यावेळी काय घडलेलं.

भारतात धुरंधर चित्रपट हिट ठरतोय, तर शेजारच्या पाकिस्तानात या चित्रपटावरुन वाद सुरु आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधीची कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक किस्से समोर येत आहेत. यातल्या अनेक गोष्टी या तथ्यांवर आधारित आहेत. दुबईत एक आलिशान जग दिसत असलं, तरी एक काळी दुनिया सुद्धा आहे. चकाकणाऱ्या इमारती आणि ग्लोबल फायनान्स सेंटर दुबईची ओळख बनलं आहे. पण काळ्या विश्वाचं सुद्धा या आडून काम चालतं. हवाला आणि शॅडो बँकिंगच्या माध्यमातून अब्जावधी रुपये इथून-तिथे फिरवले जातात. याच अंडरवर्ल्डच्या फायनान्शिअल सिस्टिमचा केंद्र होता जावेद खानानी आणि अल्ताफ खानानी. धुरंधर चित्रपटात या दोघांची सुद्धा कथा दाखवण्यात आली आहे.
जावेद खानानी आणि अल्ताफ खानानी या दोघांना पाकिस्तानातील सर्वात मोठ्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच मास्टरमाइंड मानलं जातं. धुरंधर चित्रपटात दाखवलेल्या काल्पनिक ‘खानानी ब्रदर्स’ पेक्षा खरी गोष्ट खूप खतरनाक आहे. ISI च्या छत्रछायेखाली या खानानी ब्रदर्सनी आपल्या नेटवर्कचा विस्तार केला. बराच पैसा कमावला. भारताच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासह दहशतवादी संघटनांना फंडिंग करण्याचं काम हेच जावेद खानानी आणि अल्ताफ खानानी करायचे.
फायनान्शियल स्विचबोर्ड सारखं काम करायचं
खानानी ब्रदर्सची खानानी अँड कालिया इंटरनॅशनल (KKI) नावाची एक कंपनी होती. या कंपनीला नंतर अमेरिकी वित्त विभागाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना ठरवत बंदी घातली. अमेरिकी आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनुसार या कंपनीचं नेटवर्क लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनी साठी फायनान्शियल स्विचबोर्ड सारखं काम करायचं. भारतात बनावट नोटा पाठवून अर्थव्यवस्थेला कमकुवत करत होते. हा पैसा काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी वापरला जात होता.
सगळी ताकदच संपून गेलेली
या दोन बंधुंमध्ये जावेद खानानीचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला होता. डॉन न्यूज पेपरनुसार कराची येथे एका निर्माणाधीन इमारतीवरुन पडून जावेद खानानीचा मृत्यू झालेला. काही मिडिया रिपोर्टनुसार त्याने आत्महत्या केलेली. पण जावेद खानानीच्या मृत्यूची वेळ खूप प्रश्न निर्माण करणारी आहे. डिसेंबर महिन्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कसा झाला हे एक कोडचं आहे. पण त्याच्या मृत्यूच्या एक महिना आधी 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने देशात नोटबंदी केलेली. त्यामुळे 500 आणि 1000 रुपयांच्या नोट फक्त कागद बनलेल्या. भारताचा हा निर्णय जावेद खानानीसाठी मोठा झटका होता. कारण त्याची सगळी ताकदच संपून गेलेली. त्यातून त्याने आत्महत्या केली असं बोललं जातं.
