
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आता जवळपास महिना होईल. या स्पाय अॅक्शन चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘छावा’सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांना मागे टाकलं आहे. एकीकडे प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं, तर काहींनी त्यावर ‘प्रोपेगेंडा’ (प्रचारकी) असल्याचा ठपका लावला. आता प्रदर्शनाच्या 27 दिवसांनंतर या चित्रपटात दोन मोठे बदल करण्यात येणार आहेत. त्यानंतर हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, 31 डिसेंबर 2025 रोजी देशभरातील थिएटर्सना एक ई-मेल मिळाला होता. या ई-मेलद्वारे चित्रपटात हे बदल करण्याचे आदेश देण्यात आले होते.
थिएटर्सच्या मालकांना मिळालेल्या ई-मेलमध्ये त्यांना डीसीपीमध्ये (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी) बदल झाल्याची माहिती देण्यात आली होती. या बदलाचं कारण म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून मिळालेल्या सूचनांनुसार चित्रपट निर्मात्यांनी त्यातून दोन शब्द ‘म्यूट’ केले आहेत आणि त्यातील एक डायलॉगसुद्धा बदलला आहे. थिएटर्सना चित्रपटाचं नवीन व्हर्जन डाऊनलोड करून 1 जानेवारी 2026 पासून ती प्रदर्शित करण्यास सांगण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर’च्या नव्या व्हर्जनमधून काढून टाकण्यात आलेला एक शब्द ‘बलोच’ हा आहे.
रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्या भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ने जगभरात बॉक्स ऑफिसवर तब्बल 1117.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. भारतात या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 28 व्या दिवशी 11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर आतापर्यंत भारतातील कमाईचा आकडा 723.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जगभरात सुरू असलेल्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांचाही या चित्रपटाच्या कमाईला चांगला फायदा झाला आहे. याच कारणामुळे या चित्रपटाने परदेशात 26 दशलक्ष डॉलरचा आकडा पार केला आहे. असं असलं तरी या चित्रपटाला मोठा तोटाही सहन करावा लागला आहे. मिडल ईस्टमध्ये या चित्रपटावर बंदी घातल्याने जवळपास 90 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं वितरकांनी स्पष्ट केलं. धुरंधर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तान, बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरब आणि युएईमध्ये बंदी घालण्यात आली आहे.