Kajal Aggarwal : ‘सिंघम’ फेम काजल अग्रवालचा अपघातात मृत्यू? नेमकं काय आहे सत्य?

अभिनेत्री काजल अग्रवालचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची अफवा सोमवार रात्रीपासून सोशल मीडियावर पसरली आहे. या अपघातात काजल गंभीर जखमी झाली असून तिचा मृत्यू झाल्याची ही अफवा होती.

Kajal Aggarwal : सिंघम फेम काजल अग्रवालचा अपघातात मृत्यू? नेमकं काय आहे सत्य?
Ajay Devgn and Kajal Aggarwal
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2025 | 9:01 AM

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालबद्दल सोशल मीडियावर एक अशी अफवा पसरली, जी वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. काजलचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका अपघातात काजल गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर होतेय. यावर आता खुद्द काजलने स्पष्टीकरण दिलं आहे. या सर्व चर्चा खोट्या आणि तथ्यहीन असल्याचं तिने म्हटलंय. सोमवारी काजलने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुखरुप असल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये तिने तिची प्रकृती चांगली असल्याचं नमूद केलं. त्याचप्रमाणे अशा निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे.

‘मला काही निराधार बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत. ज्यात असा दावा केला जातोय की माझा अपघात झाला (आणि त्यात मी माझे प्राण गमावले). प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे सर्व खूपच मजेशीर आहे, कारण ते पूर्णपणे खोटं आहे. देवाच्या कृपेनं, मी तुम्हा सर्वांना खात्री देऊ इच्छिते की मी पूर्णपणे ठीक आहे, सुरक्षित आहे खूप चांगलं काम करतेय. मी तुम्हाला विनंती करते की अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या व्हायरल करू नका. आपण आपल्या सकारात्मक ऊर्जेवर आणि सत्यावर लक्ष केंद्रीत करुयात’, अशी पोस्ट काजलने लिहिली आहे.

काजल अग्रवालची पोस्ट-

सोमवारी रात्री सोशल मीडियावर अफवा पसरली की काजल अग्रवालचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. काजल एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. काजल ही बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने सोशल मीडियावर तिच्या मृत्यूची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली. अवघ्या काही मिनिटांत #KajalAggarwal असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि तिचे चाहते चिंता व्यक्त करू लागले होते. अखेर काजलने पोस्ट लिहित या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

काजलने बिझनेसमन गौतम किचलूशी लग्न केलं असून या दोघांना एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या पतीसोबत मालदीवला फिरायला गेली होती. या व्हेकेशनचे फोटोसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. काजल नुकतीच ‘कन्नप्पा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. याशिवाय सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत ती ‘सिकंदर’ या बॉलिवूड चित्रपटातही झळकली होती.