असे घाणेरडे पीआर खेळ खेळून..; दीपिका पादुकोणवर भडकला दिग्दर्शक

अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या आगामी चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आता संदीपने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला आहे.

असे घाणेरडे पीआर खेळ खेळून..; दीपिका पादुकोणवर भडकला दिग्दर्शक
दीपिका पादुकोण, संदीप रेड्डी वांगा
Image Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2025 | 3:02 PM

‘कबीर सिंग’, ‘ॲनिमल’ यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने त्याच्या आगामी ‘स्पिरीट’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर अखेर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोणने अचानक माघार गेल्याचं वृत्त होतं. दीपिकाचा उल्लेख न करता संदीपने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेत्रीवर ‘घाणेरडे पीआर खेळ’ खेळल्याचा आणि चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. दीपिकाच्या एग्झिटनंतर या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीची एण्ट्री झाली आहे. तृप्तीने याआधी संदीपच्या ‘ॲनिमल’मध्ये काम केलं होतं. आता ‘स्पिरीट’मध्ये ती साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

संदीपच्या या चित्रपटातील बोल्ड कंटेट आणि शूटिंगच्या दीर्घ शेड्युल्समुळे दीपिकाने माघार घेतल्याचं म्हटलं गेलं. यावरून आता संदीपने लिहिलं, ‘जेव्हा मी एखाद्या कलाकाराला चित्रपटाची कथा सांगतो, तेव्हा त्याच्यावर मी 100 टक्के विश्वास ठेवतो. आमच्यात चित्रपटाची कथा इतर कोणासमोरही उघड न करण्याचा अलिखित करार असतो. पण असं करून तू स्वत: कशी व्यक्ती आहे, याचा खुलासा केला आहेस. तरुण अभिनेत्रीला कमी लेखणं आणि माझी कथा इतरांना सांगणं.. तुझ्या स्त्रीवादाचा अर्थ हाच आहे का?’

‘एक दिग्दर्शक म्हणून माझ्या कलेमागे अनेक वर्षांची मेहनत असते आणि माझ्यासाठी दिग्दर्शनच सर्वस्व आहे. तुला ते समजलं नाही. तुला ते कधी समजणारही नाही. एक काम कर.. पुढच्या वेळेस संपूर्ण कथाच सांगून टाक. कारण मला फरक पडत नाही. मला ही म्हण खूप आवडते, खुंदक में बिल्ली खंबा नोचे’, अशा शब्दांत त्याने राग व्यक्त केला आहे. त्याने उल्लेख केलेल्या म्हणीचा अर्थ जेव्हा एखादी व्यक्ती रागाच्या भरात आपली चूक किंवा पराभव लपवण्यासाठी विचित्र गोष्टी करू लागते असा होता. याच पोस्टमध्ये संदीपने ‘डर्टी पीआर गेम्स’चा हॅशटॅग जोडला आहे.

संदीपची ही पोस्ट स्पष्टपणे दीपिकासाठी असल्याचं म्हटलं जात आहे. दीपिकाने संदीपच्या चित्रपटात काम करण्यासाठी काही अटी ठेवल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यात कमी कामाचे तास, नफ्यातील भाग आणि तेलुगू संवादांबद्दल संकोचलेपणा व्यक्त करण्यात आला होता. ज्या दिवशी तृप्ती डिमरीच्या नावाची घोषणा झाली, त्याच दिवशी दीपिकाच्या एग्झिटच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे संदीपने ज्या वेळी ही पोस्ट लिहिली, त्यावरून ती दीपिकाला उद्देशूनच लिहिल्याचा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. दीपिकाने चित्रपटाच्या कंटेटमुळे आणि प्रॉडक्शन टीमच्या मागण्यांमुळे माघार घेतल्याचं म्हटलं गेलं. संदीपच्या या पोस्टवर अद्याप दीपिकाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.