
Sridevi Last Wish: बॉलिवूडच्या दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांनी 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं आणि त्यानंतर संपूर्ण बॉलिवूडवर राज्य केलं. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे… पण वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला…
श्रीदेवी यांच्या निधनानंतर सिनेविश्वात देखील शोककळा पसरली. फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. भाच्याच्या लग्नात गेलेल्या श्रीदेवी यांचं निधन दुबईत झालं. दुबईतील एका हॉटेलच्या खोलीत अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या धक्क्याने श्रीदेवी यांचं कुटुंब हताश झालं. पण, दुःखाच्या वेळीही कुटुंबाने त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली.
अनेक मुलाखतींमध्ये श्रीदेवी यांनी स्वतःच्या शेवटत्या इच्छेबद्दल सांगितलं होतं. श्रीदेवी स्वतःच्या शेवटच्या इच्छेबद्दल म्हणाल्या होत्या, ‘जेव्हा माझी अंत्ययात्रा काढली जाईल तेव्हा मला सर्वकाही पांढऱ्या फुलांनी सजलेलं हवं आहे…’ अशात जेव्हा 8 वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर श्रीदेवी यांची अत्यंयात्रा काढण्यात आली तेव्हा सर्वकाही पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आलं होतं. ज्या ट्रकमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं, तो ट्रक देखील सफेद फुलांनी सजवण्यात आला होता.
सांगायचं झालं तर, श्रीदेवी यांच्या निधनानंतर, ज्या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं ती जागा देखील पांढऱ्या गुलाब आणि पांढऱ्या चमेलीने सजवण्यात आली होती. खरंतर, श्रीदेवींना पांढरा रंग खूप आवडायचा. कुटुंबाने त्यांच्या इच्छेनुसार अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार केले होते. श्रीदेवी त्यांच्या सिनेमांमध्ये अनेकदा पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसल्या.
1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सोलहवां सावन’ सिनेमातून श्रीदेवी यांनी करीयरची सुरुवात केली. में ‘हिम्मत वाला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘लाडला’, ‘खुदा गवाह’, ‘लम्हे’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘चांदनी’ आणि ‘नगीना’ सिनेमात श्रीदेवी यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्याचं मनोरंजन केलं. आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील.