
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना करतेय. दीपिकाला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं असून नुकतीच तिच्यावर सर्जरी करण्यात आली. तब्बल 14 तासांच्या सर्जरीनंतर तिचा पती शोएब इब्राहिमने तिच्या आरोग्याविषयी अपडेट दिली आहे. दीपिकाची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून पुढील काही दिवस तिला रुग्णालयातच राहावं लागेल, असं त्याने सांगितलं. या सर्व कारणांमुळे दीपिका आणि शोएब यंदा कुटुंबीयांसोबत बकरीद साजरी करू शकले नाही. तरी दीपिकाच्या बकरीदला तिच्या सासऱ्यांनी म्हणजेच शोएबच्या वडिलांनी खास बनवण्याचा प्रयत्न केला.
शोएबच्या वडिलांनी मुलासाठी आणि सुनेसाठी रुग्णालयात ईदी पाठवली होती. आपण कुटुंबीयांपासून दूर आहोत, असं वाटू नये म्हणून त्यांनी ही काळजी घेतली. शोएबने रुग्णालयातून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात दोन लिफाफे पहायला मिळत आहेत. वडिलांनी आम्हा दोघांसाठी खास ईदी पाठवली आहे, असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या फोटोमध्ये दीपिकाचाही हात पहायला मिळत आहे. तिने ईदीचं पाकिट तिच्या हातात पकडलं आहे. त्याचसोबत शोएबने त्याच्या चाहत्यांना बकरीदच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.
10 तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची आयसीयूमध्ये बारकाईने देखरेख करणं आवश्यक असतं. चयापचय, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणं आणि रक्त गोठण्यात यकृताची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर शरीराला त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यातही वेदना किती होतायत, संसर्ग रोखणं आणि यकृताचं कार्य स्थिर करणं या महत्त्वपूर्ण गोष्टी असतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.
दीपिकाच्या सर्जरीनंतर शोएबने सांगितलं, “उद्या ईद अल अधा आहे आणि आज या शुभ दिनी दीपिका आयसीमधून बाहेर आली आहे. ती तीन दिवस आयसीयूमध्ये राहिली आणि सर्जरीनंतर तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. डॉक्टरांनी तिला आयसीयूमधून बाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे.”
“आम्ही सर्वजण खूप चिंतेत होतो. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की सर्जरी खूप मोठी असेल. सकाळी 8.30 वाजता तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं. तर रात्री 11.30 वाजता ती ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली होती. तिला आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर माझी तिच्याशी भेट झाली. आम्हाला ऑपरेशन थिएटरमधून काहीच अपडेट मिळत नव्हती, त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला होता.