
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालंय. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली होती. दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिम हे सतत चाहत्यांना आरोग्याविषयीची अपडेट देत आहेत. दीपिकाच्या लिव्हरमध्ये आधी ट्युमर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. परंतु नंतर हा ट्युमर कॅन्सरचा असल्याचं निदान झालं. यानंतर दीपिका पूर्णपणे खचली होती. अशा कठीण परिस्थितीत शोएब आणि त्याचे कुटुंबीय तिची खूप साथ देत आहेत. नुकतंच शोएबने सोशल मीडियावर पोस्ट लिहित दीपिकाच्या सर्जरीविषयी माहिती दिली आहे. दीपिकावर आज (3 जून) शस्त्रक्रिया होणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.
सोमवारी रात्री शोएबने ही पोस्ट लिहिली असून त्यात त्याने म्हटलंय, ‘दीपिकाची सर्जरी उद्या सकाळी होणार आहे. ही सर्जरी खूप मोठी आणि दीर्घ असेल. तिला तुमच्या प्रार्थनांची आणि शक्तीची खूप जास्त गरज आहे. कृपया तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.’ 2 जून रोजी त्याने रात्री 10 वाजरा इन्स्टा स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली होती. दीपिकावर गेल्या आठवड्यातच सर्जरी होणार होती. परंतु तिला सतत ताप येत असल्याने डॉक्टरांनी सर्जरी पुढे ढकलली होती.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर शोएब आणि दीपिकाने त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट केला होता. त्यामध्ये ती म्हणाली होती, “कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी खूप भीतीदायक, घाबरवणारा असतो. हा आजार मानसिकदृष्ट्या खूप घाबरवतो. परंतु डॉक्टरांनी सांगितलं आहे की मी पूर्णपणे बरी होऊ शकते. मला गॉल ब्लॅडरमधील स्टोनमुळे पोटात सतत दुखायचं. जेव्हा उपचारांनीही हे दुखणं बरं झालं नाही तेव्हा आम्ही सिटी स्कॅन केलं. त्यात ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. नंतर समजलं की तो कॅन्सरचा ट्युमर आहे. ही देवाच्या परीक्षेची वेळ आहे, पण यातूनही आम्ही लवकरच बाहेर पडू.”
बरगड्यांच्या खाली उजव्या बाजूला गाठ जाणवणं, त्या बाजूला वेदना होणं, पोटात सूज येणं, कावीळ, नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवणं, भूक न लागणं, वजन कमी होणं, गडद रंगाची लघवी होणं.. ही यकृताच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.