दीपिकाला चुकीच्या पद्धतीने जेवण बनवणं पडलं महागात? लिव्हर कॅन्सरची ही लक्षणे, कारणे एकदा वाचाच
अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या लिव्हर कॅन्सरशी झुंज देत असून सोशल मीडियावर तिने याबाबती माहिती दिली. दीपिकाच्या या पोस्टनंतर लिव्हर कॅन्सरविषयी नेटकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याची लक्षणे आणि कारणे काय, ते पहा..

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला दुसऱ्या स्टेजच्या लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली होती. स्टेज 2 लिव्हर कॅन्सरसोबतच दीपिकाच्या गॉल ब्लॅडरमध्ये स्टोनसुद्धा झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळी ती आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करतेय. लिव्हर कॅन्सर म्हटल्यावर अनेकांना वाटतं की अतिमद्यपानामुळे झालं असावं. परंतु प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत ही कारणं वेगळी असू शकतात. त्यापैकी एक कारण हे चुकीच्या पद्धतीने जेवण बनवण्याचंही असू शकतं. विशेषकरून आहारात मांसाहार अधिक असेल तर त्याच्या बनवण्याच्या आणि खाण्याच्या पद्धतींशीही आरोग्याच्या समस्या निगडीत असू शकतात.
या आजाराची लक्षणे काय?
बरगड्यांच्या खाली उजव्या बाजूला गाठ जाणवणं, त्या बाजूला वेदना होणं, पोटात सूज येणं, कावीळ, नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवणं, भूक न लागणं, वजन कमी होणं, गडद रंगाची लघवी होणं.. ही यकृताच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.
जेवण बनवण्याच्या पद्धतींमुळे आरोग्याला धोका
ग्रिलिंग, बार्बीक्यू आणि पॅन फ्राइंग पदार्थ यांमुळे आरोग्याच्या विविध समस्या जाणवू शकतात. विशेषकरून मांसाहार बनवताना अधिक काळजी घ्यायला हवी. 2020 च्या एका अभ्यासानुसार, मांसाला प्रमाणापेक्षा जास्त शिजवल्यास त्यात कॅन्सर निर्माण करणारे PAHs आणि HCAs कंम्पाऊंड बनतात. हे सेल्स डीएनला खराब करतात. याशिवाय रक्तातील टॉक्सिन्स मोठ्या प्रमाणात वाढतात. हे विषारी तत्त्व रक्ताच्या आधारे संपूर्ण शरीरात पसरतात आणि शरीरातील कोणत्याही अवयवावर कॅन्सरचा प्रभाव पाडू शकतात.
बटाट्यासारख्या अनेक पदार्थांमध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असतं. हे पदार्थ आपण जेव्हा उच्च तापमानावर शिजवतो किंवा डीप फ्राय करतो तेव्हा त्यात एक्रिलामाइड तयार होतो. यालाही कार्सिनोजेनिक मानलं जातं आणि ते शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतं. त्यामुळे स्टार्च असलेले पदार्थ अधिक शिजवू नये.
जेवण बनवण्याची योग्य पद्धत काय?
डीप फ्राय किंवा उच्च तापमानाचा वापर करून शिजवलेले पदार्थ खाणं टाळावेत. त्याऐवजी तुम्ही पोचिंग, प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवणं, कमी तापमानावर बेकिंग किंवा रोस्टिंग करणं या पर्यायांचा अवलंब करू शकता. त्याचसोबत अति प्रमाणातील मद्यपान, धूम्रपान, प्रोसेस्ड मांस, फ्राइड फूड टाळावेत.
टिप- या लेखात दिलेल्या टिप्स सामान्य माहितीसाठी आहेत. टीव्ही 9 त्याच्या सत्यतेची, अचूकतेची आणि परिणामकारकतेची जबाबदारी घेत नाही. ते कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधांचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
