दीपिकाला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान; सोशल मीडियावर केला खुलासा
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तिच्या आरोग्याविषयी मोठी माहिती दिली आहे. दीपिकाला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे. दीपिकाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत तिच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून दीपिका आरोग्याच्या समस्यांना सामोरं जात होती. युट्यूब चॅनलमधील व्लॉगद्वारे ती आणि तिचा पती शोएब इब्राहिम सतत आरोग्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत होते. याआधी तिने लिव्हरमध्ये ट्युमर असल्याची माहिती दिली होती. परंतु तो ट्युमरच कॅन्सर असल्याचं आता तिने स्पष्ट केलंय.
दीपिकाची पोस्ट-
‘तुम्हा सर्वांना माहितच असेल की गेले काही आठवडे आमच्यासाठी खूप कठीण गेले आहेत. पोटातील वरच्या भागातील वेदनांमुळे रुग्णालयात जाणं, त्यानंतर लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचं ट्युमर असल्याचं निदान होणं आणि त्यानंतर तो ट्युमर दुसऱ्या स्टेजचा मॅलिग्नंट (कॅन्सर) असल्याचं स्पष्ट होणं.. हा सर्वांत कठीण काळ आम्ही पाहिला आणि अनुभवला आहे. परंतु या सर्व आव्हानांना मी सकारात्मकतेने सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. त्यातून मी अधिक सक्षम होऊन बाहेर पडेन. या परिस्थितीत संपूर्ण कुटुंबीय माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. कुटुंबीयांच्या आणि तुम्हा सर्वांकडून मिळणाऱ्या प्रेमाच्या, प्रार्थनेच्या आधारावर मी यातून लवकरच बाहेर पडेन. तुमच्या प्रार्थनांमध्ये मला ठेवा’, अशी पोस्ट दीपिकाने लिहिली आहे.
View this post on Instagram
दीपिकाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दीपिका मी तुझ्यासोबत नेहमीच आहे. तू खूप स्ट्राँग आहेस आणि परिस्थितीशी लढणारी आहेस. तू ठीक होशील. माझ्याकडून तुला खूप सारं प्रेम आणि ताकद’, असं ‘बिग बॉस’ फेम राजीव अदातियाने म्हटलंय. तर ‘प्रार्थना आणि खूप प्रेम’, असं अभिनेत्री श्रद्धा आर्याने लिहिलंय. ‘प्रार्थना आणि ताकद’, अशी कमेंट अभिनेत्री डेल्नाज इराणीने लिहिली आहे. तर आशा सोडू नकोस, तू नक्कीच कॅन्सरला हरवशील.. असं गौरव खन्नाने म्हटलं आहे. याशिवाय अविका गौर, विनीत जैन, शिल्पा खटवानी, मेघा धाडे, सयांतनी घोष, आरती सिंह, काम्या पंजाबी, शिवानी पटेल, जयती भाटिया, जुही परमार यांसारख्या सेलिब्रिटींनीही दीपिकाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दीपिकाचा पती शोएब गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स देत होता. युट्यूब चॅनलवर शोएब आणि दीपिका तिच्या आरोग्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले होते. या आठवड्यात दीपिकावर शस्त्रक्रिया होणार होती. परंतु तापामुळे तिची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं शोएबने सांगितलं. पोटातील ट्युमर काढल्यानंतर माझी प्रकृती पूर्णपणे ठीक होईल, असं आश्वासन डॉक्टरांनी दिल्याचं दीपिकाने म्हटलं होतं. परंतु ते ट्युमर कॅन्सरचं असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
दीपिका आणि शोएबने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याच मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि त्यानंतर 2023 मध्ये दीपिकाने मुलाला जन्म दिला. दीपिकाने ‘बिग बॉस’च्या बाराव्या सिझनचं विजेतेपदही पटकावलं आहे.
