Priya Marathe: “मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?”, प्रिया मराठेच्या आठवणीत दिग्दर्शक भावूक

Priya Marathe: अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. दिग्दर्शक विजू माने यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Priya Marathe: मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?, प्रिया मराठेच्या आठवणीत दिग्दर्शक भावूक
Viju Mane
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 31, 2025 | 6:47 PM

‘या सुखांनो या’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती. आज, 31 ऑगस्ट रोजी तिने मीरा रोड येथील राहत्या घरात वयाच्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियाला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. दिग्दर्शक विजू माने आणि प्रिया मराठे यांचे खूप जवळचे नाते होते. प्रियाच्या निधनानंतर विजू मोने भावूक झाल्याचे दिसत आहे.

काय आहे पोस्ट?

विजू मानेने त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर प्रियाच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. ‘A fairytale ends… मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का? हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे. सssssssर अशी मोठ्यान्ने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोहून जास्त वयाच्या ह्या पोरीला मी मनापासून ‘लेक’ मानलं होतं’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

वाचा: प्रियाचा अवघ्या 38व्या वर्षी मृत्यू, अगदी कमी वयात कर्करोग का होतो? काय आहेत लक्षणे?

पुढे ते म्हणाले, ‘बांदोडकर कॉलेजात एक मॉब प्ले केला होता. अ फेअरी टेल… प्रियाचं रंगभूमीवरलं पहिलं काम. तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं. राजकन्या होती त्यात ती. तेच बोट धरून माझ्या आयुष्यात वावरली. माझ्या मुलीला मी सांगायचो, तुझ्याआधी मला एक मुलगी आहे बरं का… तिच्या आयुष्यातले खूप चढ उतार पाहिले. शंतनुसारखा गोड मुलगा तिला मिळाला. खूप बरं वाटलं होतं. गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया. बाबा मिस यू… बाबा लव्ह यू.’

प्रियाचे पहाटे निधन

प्रिया गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिने मालिकांमध्ये काम करणे बंद केले होते. पण आज, पहाटे प्रियाची प्राणज्योत मालवली. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहली आहे.